सोनाली फोगाट हिचा खून, पीए सुधीर सांगवान हाच हत्येसाठी दोषी असल्याचा आरोप

0
230

पणजी, दि. २४ (पीसीबी) – भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर मोठं षडयंत्र रचून झाल्याचा आरोप त्यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी केलाय. गोवा पोलीस स्टेशनमध्ये रिंकू यांनी तक्रार दाखल केली असून या हत्येसाठी दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान हाच त्यांच्या हत्येसाठी दोषी असल्याचा थेट आरोप रिंकू यांनी केलाय. गेल्या काही महिन्यांपासून सोनाली यांना ते ब्लॅकमेल करत होते. त्यांच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करून, अभिनेत्री आणि राजकीय करिअर संपवण्याची धमकी देत होते, त्यानेच सोनालीला जीवे मारण्याचा कट रचलाय, असा आरोप रिंकू ढाका यांनी केलाय. एवढंच नव्हे तर या प्रकरणी गोवा पोलीसदेखील तपासात प्रचंड ढिलाई दाखवत असल्याची तक्रार रिंकू यांनी माध्यमांसमोर केली आहे.

भावाचे आरोप काय ? –
सोनाली फोगाट यांच्या भावाने पोलिसांकडे केलेल्या लेखी तक्रारीत पुढील आरोप केलेत-
2019 मध्ये सोनाली फोगाट यांनी भाजपकडून आदमपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी प्रचारादरम्यान सुधीर सांगवान याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तो तिचा पीए म्हणून काम करू लागला. सुधीरसोबत सुखवीर सांगवान यांच्यावर सोनालीचा विश्वास वाढत होता. २०२१ मध्ये सोनाली यांच्या घरी चोरी झाली होती. काही काळानंतर सुधीर सांगवानने सोनालीच्या घरी काम करणारा नोकर आणि कुकलाही हटवलं. तिचं सगळं व्यवस्थापन सुधीर सांगवानच पहात होता.

तीन महिन्यांपूर्वी फोन आला होता. सुधीरने तिला खीर दिली होती. त्यानंतर तिचे हात-पाय थरथरत होते. त्यावर मी सुधीरला विचारले असता त्याने घुमून-फिरून उत्तरं दिली होती. सोनाली तिचे सर्व व्यवहार सुधीरच्या सांगण्यावरूनच करत होती.

22 ऑगस्ट 2022 रोजी सोनालीने आईला फोन केला होता… ती सांगत होती, सुधीरने खाण्यातून काहीतरी दिलंय, ज्यामुळे मला घबराहट होतेय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता सुधीरचाच माझ्या बहिणीलाच सोनालीचा शूटिंगदरम्यान मृत्यू झाल्याचा फोन आला.मी गोव्यात येऊन चौकशी केली असता इथे कोणतीही शूटिंग सुरु नसल्याचे कळले. सोनालीला चंदिगडमध्येच थांबायचे होते, पण सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीचा खून केला. तिची संपत्ती हडपण्यासाठी तसंच राजकीय षड्यंत्राच्या हेतूने तिचा खून केला. सुधीर सांगवान आणि सुखविंदर आदींविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी, ही विनंती..