चिंचवड – दि. ७ (पीसीबी) : दि. १८ ते २० जुलै २०२५ या कालावधीत दिल्ली येथे वर्ल्ड आर्चरी एशिया (WAA) मार्फत झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन चिंचवडच्या सोनल बुंदेले या महाराष्ट्राच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पंच ठरल्या आहेत त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल धनुर्विद्या क्षेत्रातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी सोनल बुंदेले यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत.
बुंदेले यांनी धनुर्विद्या या क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देत ऑलिम्पिक संघाच्या निवड चाचणी प्रमुख, खेलो इंडिया स्पर्धा तसेच नॅशनल गेम्स व विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच व प्रशिक्षक म्हणूनही कामगिरी बजावली आहे.
शिवाय धनुर्विद्येवरील मराठीतले पहिले पुस्तक लिहिण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी या खेळाचा प्रसार आणि प्रचार मराठी भाषिक खेळाडूंमध्ये केला आहे.
सध्या त्या महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेच्या सहसचिव व पिंपरी-चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव म्हणून कार्यरत असून, धनुर्विद्या क्षेत्रात त्यांचे योगदान नव खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
या निवडीबाबत सोनल बुंदेले म्हणाल्या,
“महाराष्ट्रातून पहिल्यांदाच झालेल्या या निवडीने मनस्वी आनंद झाला आहे त्याचबरोबरीने धनुर्विद्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत राहण्याची मोठी जबाबदारी हि माझ्यावर आली आहे, ती निश्चितपणे उत्तम प्रकारे पार पाडत असताना या अतिप्राचीन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या क्रीडा प्रकाराकडे आगामी काळात सर्वसामान्य घरातील खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घडवण्याचा आणि या माध्यमातून भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या क्रीडा प्रकारात सर्वोत्तम करण्याचा माझा संकल्प आहे.”