दि. 25 (पीसीबी) – मौल्यवान धातू सोन्याचे दर सध्या रॉकेटच्या तेजीत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहेत. या दोन महिन्यात सोनं पुन्हा 75 हजारांवर आलं आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सोनं प्रथमच 70 हजारांच्या पार गेलं होतं. मात्र, या सप्टेंबर महिन्यात हा रेकॉर्ड मोडला आहे. या आठवड्यात अवघ्या चारच दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 77 हजार रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ खूपच कमी झाली आहे.
ऐन सणा-सुदीच्या काळात सोनं तेजीत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांनी सोन्याच्या खेरदीकडं पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. सोनं महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अशा स्थितीत सोनं खरेदी करावं की नाही?, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
चांदीचे दर देखील गगनाला भिडले आहेत. चांदीचे दर प्रतिकिलो 90000 रुपये झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, वर्षअखेरीस सोन्याचा भाव 80 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. फेडने पॉलिसी रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. चालू वर्षात आणखी 50 बेसिस पॉइंट्सची कपात करायची आहे. यामुळे सोनं आणखी महाग होणार, अशी चर्चा आहे.
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
22 आणि 24 कॅरेटमधील फरक काय?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध सोने मानले जाते. 22 कॅरेट सोने तांबे, चांदी, जस्त यांसारखे 9% इतर धातू जोडून तयार केले जाते. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
घरबसल्या जाणून घ्या भाव-
दरम्यान ग्राहक घरबसल्या देखील सोने-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.