सोडा सारे काम धाम, मतदान करणे पहिले काम..

0
43

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : मतदानासाठी वेळ काढा, आपआपली जबाबदारी पार पाडा.., सोडा सारे काम धाम, मतदान करणे पहिले काम.., अशा घोषणा देत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप टीमच्या वतीने आज ठिकठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.

२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीने विविध ठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेत. आज निसर्ग कॉलनी , वैद वस्ती तसेच जिजाऊ पर्यटन केंद्र, मोरया गोसावी समाधी मंदिरा जवळ चिंचवडगाव आदी ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांनी उस्फुर्तपणे या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला तसेच मतदान शपथही घेतली.

‘स्वीप’च्या माध्यमातून शहरातील मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती वाढविण्यास तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत होत आहे. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढविणे, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविणे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढविणे, लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा यामागचा मुळ उद्देश आहे, अशी माहिती स्वीप टीमचे समन्वय अधिकारी राजीव घुले यांनी उपस्थित नागरिकांना दिली.

यावेळी स्वीप टीमचे दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे यांनी हे अभियान यशस्वीपणे पार पाडले. तसेच यावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसंदर्भात जनजागृती करण्यात आली.