पुणे, दि. १९ – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले असून त्यापैकी दोन जखमा गंभीर होत्या. या हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील दोन महिला कर्मचारीही जखमी झाल्या. पोलीसांची अनेक पथके आरोपीच्या शोधात असताना राजकीय विधानांमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा हल्ला सैफ अली खानच्या मुलांवर होता, असा दावा केला आहे. त्यानंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही हाच धागा पकडत तैमुर नावाचा उल्लेख करत विधान केले आहे.
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना आनंद दवे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्याआधी आम्ही याबाबत विधान केले होते. तैमुर या नावावरील राग व्यक्त करण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असे आम्हाला वाटत होते. तसे झाले असते, तर आम्हाला बरेही वाटले असते. पण तसे झालेले नाही. जो संशयित आरोपी पकडला गेला, तो मुस्लीम धर्मीय निघाला आहे. असे असतानाही आमदार आव्हाड हे मुस्लीम प्रेम आणि हिंदू द्वेष बाजूला करू शकलेले नाहीत, याची आम्हाला खंत वाटते.
“गुन्हेगार सापडल्यानंतर या हल्ल्यामागचा उद्देश स्पष्ट होईलच. पण हे काहीच माहीत नसताना. आरोपीला तैमूरचेच अपहरण करायचे होते, हे आव्हाड सांगत आहेत. त्यांना ही बाब कुठून कळली? हा आमचा प्रश्न आहे. हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी तुम्हीच त्या आरोपीला पाठवले होते का? की पोलीस तुम्हाला आतली बातमी देत आहेत? असे आमचे प्रश्न आहेत. आव्हाड यांनी धर्माचा द्वेष करणे आता तरी थांबावे, असे आमचे त्यांना आवाहन आहे”, असेही आनंद दवे यावेळी म्हणाले.
सैफ अली खानच्या जागी दुसरा एखादा अभिनेता असता तर जितेंद्र आव्हाड एवढे उद्विग्न झाले नसते. आम्ही कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करत नाही. पण इतरांवर असा प्रसंग आला असता तर त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले असते. मात्र सैफ अली खानचे नाव पुढे आल्यानंतर स्वतःच्या मतदारसंघात भावनिक लाट निर्माण करत राज्यात धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न आव्हाड करत आहेत, असाही आरोप आनंद दवे यांनी केला आहे.