सैन्य दलातून निवृत्त झालेल्या राष्ट्रीय खेळाडूचा ताम्हिणी घाटात वाहून गेल्याने मृत्यू

0
125

भोसरी, दि. ३ – सैन्य दलातून निवृत्त झालेल्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडूचा ताम्हिणी घाटातील एका धबधब्यात उडी मारल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 30) दुपारी घडली. वाहून गेलेल्या खेळाडूचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळला.

स्वप्निल संपत धावडे (वय 38, रा. धावडे वस्ती, भोसरी) असे मृत्यू झालेल्या राष्ट्रीय खेळाडूचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, स्वप्निल धावडे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. 18 वर्ष सेवा बजावल्या नंतर अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले होते. तसेच ते बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू होते. सेवानिवृत्ती नंतर ते एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होते.

जिम मधील 32 जणांच्या ग्रुपसोबत स्वप्निल हे रविवारी ताम्हिणी घाटात फिरायला गेले होते. तिथे प्लस व्हॅली येथे धबधब्याच्या कुंडात स्वप्नील यांनी उडी मारली. दरम्यान त्यांचा एक सहकारी याचा व्हिडिओ बनवत होता. स्वप्नील यांनी धबधब्याच्या कुंडात उडी मारल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बाजूला येण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले.

पौड पोलीस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी संयुक्तपणे स्वप्निल यांची शोध मोहिम राबविली. मात्र, या पथकांना कोठेही स्वप्निल आढळून आले नाहीत. पाण्याचा जोर वाढत असल्याने शोध कार्यात अडचणी येत होती. दरम्यान, भुशी येथील दुर्घटनेतील मयतांना शोधण्यासाठी काही पथके भुशी धरण परिसरात रवाना झाली.

रविवारी काही पथकांकडून शोळ कार्य सुरू होते. रात्री पर्यंत स्वप्निल यांचा शोध न लागल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्यास सुरुवात केली असता रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे स्वप्निल यांचा मृतदेह आढळून आला.

स्वप्निल हे पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील नेमबाज रश्मी धावडे यांचे पती होते. स्वप्निल यांचा मृतदेह माणगाव येथून भोसरी येथे आणण्यात आला. भोसरी तळ्याकाठी सोमवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.