सेवा विकास सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील अमर मुलचंदानींना अखेर ईडीकडून अटक

0
369

पिंपरी, दि. ०५ जुलै (पीसीबी) – पुण्यातल्या पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेतील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ईडीने बुधवारी व्यावसायिक आणि माजी उपमहापौर अमर मुलचंदानी यांना अटक केली. सेवा विकास सहकारी बँकेत तब्बल 429.6 कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेतील आर्थिक अफरातफर प्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरु आहे. या प्रकरणात ईडीने अखेर अमर मुलचंदानी यांना अटक केली. अमर मुलचंदानी यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना ७ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. अमर मुलचंदानीने बँकेतील सार्वजनिक ठेवींना वैयक्तिक जामीन ग्राह्य धरले आणि बँकिंग नियमांचे उल्लंघन करीत ठराविक कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केले होते. याप्रकरणी ईडीने मुलचंदानी यांची मालमत्ता याआधीच जप्त केली आहे.

सेवा विकास सहकारी बँकेतील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने याआधीच अमर मुलचंदानी, विवेक अरान्हा, सागर सुर्यवंशी, खेमचंद भोजवानी यांच्याविरोधात कारवाई केली होती. ईडीने या सर्वांच्या कुटुंबातील 121.81 कोटी रुपयांच्या 47 स्थावर मालमत्ता आणि 54.25 लाख रुपयांच्या जंगम मालमत्ता जप्त केल्या होत्या. 2002 च्या पीएमएल कायद्यांतर्गत तरतुदीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली होती.

दरम्यान, संयुक्त निबंधकांनी (ऑडिट) संपूर्ण सेवा विकास सहकारी बँकेचे ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये 124 एनपीए कर्ज खात्यांमध्ये 429.6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि अफरातफर झाल्याचे उघड झाले होते. त्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह कर्ज लाभार्थी आणि बँक व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरबीआयने बँकेचा परवाना देखील रद्द केला होता.