सेवा भवन प्रकल्पातर्फे‘सेवा भवन रन’ मॅरेथॉनचे आयोजन

0
5

पुणे, दि. 17 (पीसीबी)
‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन रन’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजता कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून या मॅरेथॉनला प्रारंभ होईल.

‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे सेवा भवन हा सेवा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पाच्या वतीने ही मॅरेथॉन होत आहे.

मॕरेथॉनमध्ये १८ वर्षांवरील महिला आणि पुरुषांना सहभागी होता येईल. त्यासाठी नोंदणी आवश्यक असून ८२७५३९६३९७ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येईल. पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे मॅरेथॉनचे दोन टप्पे आहेत. या शिवाय ‘चॅरिटी रन’ हा उपक्रमही केला जाणार आहे.

‘सेवा भवन’ या प्रकल्पात अल्प दरात डायलिसिसची सुविधा असून पुण्यात उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची निवास, भोजन आदी व्यवस्थाही अल्प शुल्कात केली जाते. याशिवाय निःशुल्क स्वास्थ सल्ला आणि समुपदेशन केंद्रही चालवले जाते. किडनी आजारासंबंधीची जनजागृती आणि सेवा भवन प्रकल्पाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आल्याची माहिती जनकल्याण समितीचे कार्यवाह प्रमोद गोर्‍हे आणि सेवा भवन प्रकल्पाचे कार्यवाह पलाश देवळणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.