पिंपरी, दि. ५(पीसीबी) – सेवानिवृत्त मुख्याध्यापिका व तालुका मास्तर श्रीमती माया नरसिंह वैद्य (वय 84) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. शेवगाव जि. नगर येथील जिल्हा परिषद शाळेतून १९९७ मध्ये तालुका मास्तर या पदावरून त्या निवृत्त झाल्या. त्यांचा धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग असे. श्री स्वामी समर्थांच्या सेवेत अखेरच्या श्वासापर्यंत मग्न होत्या.
श्रीमती माया वैद्य या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या मूळ रहिवासी होत. साहित्य वाचन व लेखनाची त्यांना विशेष आवड होती. अहिराणी भाषेतील रचना तसेच जात्यावरच्या ओव्या, रचना तयार करणे हा त्यांचा आवडीचा विषय होता. ज्येष्ठ लेखक दा. दे. वैद्य लिखीत ‘ज्ञानेश्वरी वाक् सुधा’, ‘आदर्श विद्यार्थी’ या दोन पुस्तकांचे हस्तलेखन माया वैद्य यांनी केले होते. निस्सिम स्वामीभक्त अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या गावी श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभे करण्यात त्यांचा पुढाकार होता.
काही वर्षांपासून त्या निगडी पुणे येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विश्व सह्याद्री न्यूजचे संपादक मिलिंद वैद्य, पत्रकार मुकुंद वैद्य यांच्या त्या मातोश्री होत.