सेवानिवृत्ती कार्यक्रमात मुख्याध्यापक, शिक्षकांनी केला मतदान करण्याचा निर्धार

0
3

थेरगाव, दि. 28 (पीसीबी) – काळेवाडी येथील आरंभ बॅक्वेट हॉल येथे महापालिका शाळेमधील मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती तसेच कार्यगौरव कार्यक्रमाचे औचित्य साधून मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक तसेच त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित नागरिकांनी मतदानाची शपथ घेतली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमचे समन्वय अधिकारी राजीव घुले यांच्या अधिपत्याखाली दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे यांनी हा मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

देशात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येक मतदार राजाला व्हायला हवी. तसेच आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील सदस्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देऊन एकूणच शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानामध्ये जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीप टीमच्या मदतीने जनजागृती अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. यासह कमी मतदान टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी बॅनर्स, होर्डिंग्स, पोस्टर्स आणि जिंगल्सच्या माध्यमातून तसेच जनजागृती अभियानाच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.