सेन्सॉर बोर्डच्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले यांचे निधन

0
299

पिंपरी दि. २८(पीसीबी) – केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) माजी अध्यक्षा व ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले यांचे बुधवारी (दि. २७) सकाळी निधन झाले.मॅट्रिक बोर्डाच्या परिक्षेत त्या मुलींमधून पहिल्या आल्या होत्या. कला शाखेत पदव्यूत्तर पदवी (एमए) घेतलेल्या मोहिले १९६५ बॅचच्या प्रशासन अधिकारी होत्या. त्यांची पहिली निवड भारतीय डाक सेवेत (इंडियन पोस्टल सर्व्हिस) झाली. अशा प्रकारची निवड होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला अधिकारी होत्या. टपाल खात्यात त्यांनी चिफ पोस्टमास्तर जनरल, पोस्टल सर्व्हीस डायरेक्टर, पोस्टल सर्व्हीसेस बोर्ड मेंबर अशा महत्वाच्या पदांवर काम करून वेगळा ठसा उमटविला आहे.

१९५१ मध्ये स्थापन झालेल्या चित्रपट परीक्षण बोर्डाच्या सल्लागार समितीवर त्यांची १९७८ मध्ये नियुक्ती झाली. बोर्डाच्या साडेपाच वर्षांच्या कार्याकालात त्या १९८२-८३ मध्ये कार्यकारी अध्यक्षा होत्या. संस्कृत, मराठी व इंग्रजी विषयात त्या पारंगत होत्या. चित्रपट व साहित्य क्षेत्रातील विजया मेहता, वंदना विटणकर, शांता शेळके यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. १९९७-९८ मध्ये त्या महाराष्ट्र व गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल होत्या. ३७ वर्ष प्रशासकीय सेवा केल्यानंतर ३१ ऑगस्ट २००२ रोजी त्या निवृत्त झाल्या. तेव्हापासून त्या निगडी- प्राधिकरणात राहात होत्या. साहित्य व संगीत विषयाची आवड असलेल्या मोहिले यांची ‘संसार आणि सेन्सॉर’ (ललितसंग्रह), ‘त्रिदल’ (नाटिकासंग्रह), ‘शब्दपुष्पांजली’ (कवितासंग्रह) आणि ‘सेन्सॉर जीवनसार आणि मी’ (आत्मचरित्रपर) ही पुस्तके प्रकाशित आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या आजीव सदस्या व पिंपरी-चिंचवड शाखेच्या सल्लागार होत्या.