सेक्स व्हिडिओने भरलेले पेन ड्राईव्ह मीच भाजपा नेत्याला दिला…

0
260

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – कर्नाटकमध्ये भाजपाने जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाबरोबर युती केली. मात्र एका सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकमधील राजकारण तापले आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू तसेच कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या विरोधात सेक्स स्कँडलचे आरोप भाजपा नेत्याने केले आहेत. आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या जुन्या ड्रायव्हरने खळबळजनक दावा केला आहे. सेक्स व्हिडिओने भरलेले पेन ड्राईव्ह मीच भाजपा नेते देवराज गौडा यांना दिल्याचे ड्रायव्हर कार्तिक याने सांगितले आहे.

त्यांनी माझ्या बायकोला मारहाण केली
कार्तिकने एक व्हिडिओ प्रसारित करून स्वतःची बाजू सांगितली आहे. रेवण्णा यांनी माझी जमीन बळजबरीने बळकावली. तसेच माझ्या पत्नीला मारहाण केली, असा आरोप कार्तिक यांनी खासदार रेवण्णा यांच्यावर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक म्हणाले, “माझे नाव कार्तिक आहे. मी प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्यांच्या कुटुंबासाठी १५ वर्ष काम केले. मागच्यावर्षीच मी माझी नोकरी सोडली. रेवण्णा यांनी माझी जमीन बळकावली, माज्या पत्नीला आणि मला मारहाण केली. त्यामुळे मी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर मी भाजपा नेत्याच्या मदतीने रेवण्णा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली. त्यांनी मला न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला होता. कालांतराने त्यांनी मला वकील मिळवून दिला.”

कार्तिक यांनी पुढे सांगितले की, गौडा यांनी मला रेवण्णा विरोधात जाहीर भूमिका मांडण्यास सांगितली होती. त्यानंतर माझ्यावर झालेला अन्याय मी जाहीर केला. गौडा यांनीही माध्यमांसमोर भाष्य केले. मात्र त्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी माझ्या बोलण्यावर न्यायालयीन स्थगिती आणली. न्यायालयाने केलेली कारवाई मी गौडा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या खासगी व्हिडिओ आणि फोटोंबद्दल विचारणा केली. या व्हिडिओ आणि फोटोद्वारे ते न्यायालयात मला न्याय मिळवून देतील, असेही त्यांनी मला सांगितल्याचे कार्तिक म्हणाले.

“देवराज गौडा यांना सर्व सेक्स व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेले पेन ड्राईव्ह दिल्यानंतर त्यांच्याकडून त्याचा काय वापर झाला? हे मला माहीत नाही. त्यांनी वैयक्तीक फायद्यासाठी याचा वापर केला का? याची मला कल्पना नाही. पेन ड्राईव्ह दिल्यानंतरही मी बराच काळ शांत होतो. त्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर ते म्हमाले की, या गोष्टी इतक्या सहजासहजी होत नाहीत. त्यामुळे मी शांत राहिलो”, असे कार्तिक यांनी सांगितले.