सूरत मधील हिरे व्यापाऱ्यांची पुन्हा मुंबईला घरवापसी

0
277

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : गुजरात सरकारनं हिरे व्यापार्‍यांसाठी बिझनेस हब म्हणून सूरतमध्ये सूरत डायमंड बोर्सची निर्मिती केली होती. सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी सुमारे 3 हजार 400 कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाचे हिरे व्यवसाय केंद्र तयार केलं आहे. त्याचप्रमाणे डायमंड बोर्सची इमारत ही जगातील सर्वात उंच इमारत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. या डायमंड बोर्समध्ये सुमारे अडीच हजार कार्यालये उभारण्यात आली आहेत. मुंबईतील बीकेसी परिसरात अनेक व्यापाऱ्यांची कार्यालय आहेत. मात्र, या जागेचे भाडं, ऑफिसच्या जागेची मर्यादा पाहता मुंबईतील खर्च वाढला आहे. त्या तुलनेत सुरतला व्यवसाय हलवल्यास उद्योगाबाबतच्या सर्व सुविधा, मुबलक जागा उपलब्ध होणार आहे. तसंच मुंबईप्रमाणे सुरतमध्ये आयात निर्यात करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं हिरे व्यापाऱ्यांनी सुरतला जाण्याचा निर्णय घेतला, असं हिरे व्यापारी दिनेश नवडिया सांगतात. प्रत्यक्षात सुरतला गेलेले बहुसंख्य व्यापारी आता पुन्हा मुंबईकडे वळले आहेत, असे वृत्त आहे.

आम्ही गेली अनेक वर्षे मुंबईत व्यवसाय करत आहोत. संपर्कामुळं आमचा मुंबईत जम बसला आहे. आमची मुलं मुंबईत शिकत आहेत, त्यामुळं आमच्यापैकी कोणीही सुरतला जायला तयार नाही, असे प्रख्यात हिरे व्यापारी जयसुखभाई यांनी सांगितले.

मुंबईतील हिरे व्यापारातील सर्वात मोठी किरण जेंमस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरतला हरवण्याचा निर्णय वल्लभभाई लखानी यांनी घेतला होता. सुमारे वीस हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली ही कंपनी मुंबईतील वाढलेला खर्च, प्रवासाचा वेळ, महागाई या सर्व गोष्टींचा विचार करून सुरतला हलवली होती. सुरतला स्थलांतरित होत असताना मुंबईतील सर्व कार्यालये बंद करणार असल्याचं त्यांनी सांगितले होतं. पण, आता ते पुन्हा मुंबईत परत येत आहेत.

किरण जेंमस पुन्हा मुंबईत –
मुंबईतील महागाईच्या समस्येमुळं अनेक व्यापाऱ्यांनी सुरतला जाण्याचा निर्णय घेतला, म्हणून आम्ही तो घेतला. लाखनी यांनी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुरतमध्ये घरे बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र, या ठिकाणी किरण जेम्स वगळता अन्य कोणत्याही कंपनीनं व्यवसाय सुरू न केल्यानं ही कंपनी एकटी पडली. एकट्या कंपनीच्या जीवावर मार्केट सुरू करणं शक्य नसल्यानं, या कंपनीला पुन्हा मुंबईचा रस्ता धरावा लागला आहे, असं व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

व्यापारी मुंबई सोडायला तयार नाहीत –
मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांनी सुरतला जाण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्यक्षात व्यापारी सुरतला गेलेच नाहीत. फक्त किरण जेम्स कंपनीनं सर्व व्यवसाय सुरतला हलवला होता. परंतु इतर 130 कंपन्यांनी सुरतला जाण्याची तयारी दर्शवली असली, तरी प्रत्यक्षात त्यांची कार्यालयं मुंबईत आहेत. डायमंड बोर्स मुख्य शहरापासून थोडं लांब आहे. तिथं संपर्काचं कोणतेही साधन नाही. त्यामुळं व्यापाऱ्यांनाही अडचणी येत आहेत, असं हिरे व्यापारी जयसुखभाई यांनी म्हटलंय.