सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणा-या ‘क्रिस्टल’च्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करा – लक्ष्मण जगताप

0
212

पिंपरी दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तांची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षारक्षकांची क्रिस्टल कंपनीकडून आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे क्रिस्टल या ठेकेदार कंपनीवर तातडीने कडक कारवाई करावी. सुरक्षारक्षकांचे थकित वेतन विनाविलंब अदा करण्याचे आदेश द्यावेत. तसेच यापुढे सर्व सुरक्षारक्षकांचे वेतन ठरलेल्या वेळेत मिळेल याची महापालिकेने व्यवस्था करावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्याने, कार्यालयांची सुरक्षा करण्यासाठी क्रिस्टल या खासगी कंपनीला कोट्यवधींचे काम देण्यात आले आहे. या खासगी कंपनीने कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. त्याचे पैसे महापालिका वेळच्या वेळी क्रिस्टल कंपनीला देत आहे. पण क्रिस्टल कंपनीमार्फत सुरक्षारक्षकांना दरमहा वेळेवर वेतन दिले जात नाही. गेल्या तीन महिन्यांपासून हे वेतन थकित आहे. त्याचप्रमाणे मार्च 2021 ते मार्च 2022 या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कमही क्रिस्टल कंपनीने सुरक्षारक्षकांच्या खात्यात जमा केले नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत.

तसेच क्रिस्टल कंपनी सर्व सुरक्षारक्षकांना कामगार कायद्याअंतर्गतचे कोणतेही लाभ देत नाही. नियमानुसार वेतनवाढही करत नाही. ही ठेकेदार कंपनी महापालिकेसोबत झालेल्या करारातील अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन करत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात संबंधित सुरक्षारक्षक व काही लोकप्रतिनिधींनी तक्रार करून क्रिस्टल कंपनीचे व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी दाद न देता उद्धटपणाने वागणूक देत असल्याबाबतच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या आर्थिक पिळवणुकीविरोधात संबंधित सुरक्षारक्षकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. काहींनी आंदोलनही केले आहेत. तरीही महापालिका प्रशासन दबावापोटी योग्य कार्यवाही करत नसल्याचे सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे.

सुरक्षारक्षकांना आपल्या मेहनतीच्या कामाचे वेतन वेळेवर न मिळत नसल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एका सुरक्षारक्षकाने आत्महत्येचाही प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. सुरक्षारक्षकांना कामगार कायद्यांतर्गत असलेले लाभ व रखडलेले वेतन करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या क्रिस्टल कंपनीवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. सुरक्षारक्षकांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे. तसेच यापुढे त्यांना दरमहा वेळेवर वेतन मिळणेबाबत प्रशासकीय स्तरावरून तातडीने कार्यवाही व्हावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.”