आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. कारण, या मतदारसंघातून एकाच घरातील दोन महिला एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यातील एक विद्यमान खासदार आहे तर, दुसरी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील ही लढत दिवसेंदिवस रंगत जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. तर, आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारच या प्रचाराला उतरले आहेत. त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली.
“बारामतीमध्ये मतं मागण्याची काहीतरी लेव्हल होती. ही लेव्हल आता सोडायला लागले आहेत. आणि त्यातून लोकांना भावनिक केलं जातंय. त्यातून काही सांगितलं जातंय. नुसतं संसदेत भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. हा अजित पवारही भाषणात नंबर एकचा आहे. माझी पट्टी लागली तर मीही भाषणं करतो. पण मी भाषणंही करतो आणि कामंही करतो. मी विकासाला निधीही आणतो आणि एखादं काम वाजवून करून घेतो”, असं अजित पवार म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे पवार-सुळेंची सत्ता आहे. तर, आता पवार विरुद्ध सुळे असा जंगी सामना रंगला आहे. त्यामुळे बारामतीकर कोणाला निवडून देतात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, अजि पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं आहे. “बारामतीकरांसमोर बाका प्रश्न उभा राहिला आहे की आता आपण काय करायचं? आपण पूर्वीपासून पवारांच्या पाठिशी उभे राहिलो. मतदानाच्या दिवशी पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे हा प्रश्न येणार नाही. परंपरा खंडित केली अशीही भावना येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“१९९१ ला खासदारकीला लेकाला म्हणजेच मला निवडून दिलं. नंतर वडिलांना निवडून दिलं. नंतर लेकीला निवडून दिलंत. आता सुनेला निवडून द्या. सगळी फिट्म फाट. वडील, लेक, कन्याही आणि सूनही खूश आणि तुम्ही खुश, अशी कोपरखळीही त्यांना मारली.