सुप्रिया सुळेंकडे दिल्ली, अजितदादांकडे महाराष्ट्राची जबाबदारी

0
243

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. या स्पर्धेत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या तीन नेत्यांची नावे आहेत. मात्र, या सर्वांमध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या अध्यक्ष होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरणार आहेत. तसेच राज्यातील एखाद्या राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्षाही ठरणार आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरूनच या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत पक्षातील नेत्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे. त्यात अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. विशेष, म्हणजे सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणारत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत पक्षाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात दादा, केंद्रात ताई
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीत आता नवा फॉर्म्युला समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करावं. त्यांना दिल्लीची जबाबदारी द्यावी आणि राज्याची जबाबदारी अजित पवार यांना द्यावी, असं राष्ट्रवादीत घटत आहे. त्यावरही आता होत असलेल्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भुजबळही तेच म्हणाले
आम्ही शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू. शरद पवारांसारखा नेता भेटणं शक्य नाही. अगदीच काही झालं नाही तर या कमिटीला निर्णय घ्यावा लागेल. राज्यात अजित पवारांनी कार्यभार पाहावा आणि देशात सुप्रिया सुळे यांनी कारभार पाहावा. त्या संसदरत्न आहेत. उत्तम काम करू शकतात, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं.

कर्नाटक दौरा रद्द
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा कर्नाटक दौरा रद्द करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा कर्नाटक दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे आज कर्नाटकात प्रचारासाठी जाणार होत्या. परंतु, राष्ट्रवादीतील घडामोडींमुळे सुप्रिया सुळे यांचा हा दौरा रद्द झाला आहे.