सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला निवडणुकीच्या रिंगणात उभं करायला नको होतं – अजित पवार

0
157

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) मुंबई: बहिणीच्या विरोधात पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यानंतर माघारी घेता येत नाही. मात्र माझं मन आज मला सांगतंय, की तसं नको व्हायला होतं” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयीत सामना झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला.

काय म्हणाले अजित पवार?
“बारामतीत तुमची कोणी लाडकी बहीण आहे का?” असा तिरकस सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, “राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, पण सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांत राजकारण चालतं. पण राजकारण हे घरात शिरु द्यायचं नसतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डकडून सुनेत्रांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. बाण एकदा सुटला, की तो माघारी घेता येत नाही. मात्र आज माझं मन मला सांगतं, की तसं व्हायला नको होतं,” असं अजित पवार म्हणाले.

…तर रक्षाबंधनालाही नक्की जाणार
रक्षाबंधनाच्या दिवशी आपण सुप्रिया सुळेंकडे जाणार का? असाही प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. “माझा सध्या राज्यभर दौरा सुरु आहे. मात्र राखी पौर्णिमेला मी जर बारामतीत असेन आणि माझ्या बहिणीही तिथे असतील तर मी नक्कीच जाईन” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

बारामतीत पवार विरुद्ध पवार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात दोन गट आमने सामने होते. सु्प्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयीत सामना असला, तरी प्रतिष्ठा सुप्रिया सुळेंसह शरद पवार आणि अजित पवार यांची पणाला लागली होती. काका पुतण्या, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, नणंद भावजय, पवार कुटुंबातील फूट अशा विविध कंगोरे असलेल्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत खासदारकी टिकवली.