सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री कविता लाड मेढेकर यांच्यासह शेकडो नाट्यरसिकांनी घेतली मतदानाची शपथ….

0
2

नाट्यरंगमंचावरून मतदानाचा जागर, पिंपरी चिंचवडमध्ये लोकशाहीचा जागर करण्यासाठी राबवण्यात आला उपक्रम

दि.३०(पीसीबी)- कलाकारांच्या शब्दांतून आणि रसिकांच्या सहभागातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करीत, लोकशाहीचा मूलमंत्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे मतदान जनजागृती उपक्रम पार पडला. कला, संस्कृती आणि लोकशाही यांचा सुरेल संगम साधत, रंगमंचाच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा संदेश नागरिकांच्या मनात रुजवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनी देखील सहभागी होत आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट…’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाच्या निमित्ताने रंगमंचावर केवळ मनोरंजनच नव्हे, तर लोकशाहीची जबाबदारीही अधोरेखित करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये शेकडो नाट्यरसिकांनी मतदानाची शपथ घेत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला. नाट्यप्रयोगासारख्या लोकप्रिय माध्यमातून मतदानाचा संदेश पोहोचविल्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण झाला असून, येणाऱ्या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मतदानाची शपथ

“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा. सर्वात प्रथम मतदान करा, कारण लोकशाही सशक्त करण्यासाठी ते अत्यंत गरजेचे आहे.
– कविता लाड मेढेकर, अभिनेत्री

येत्या १५ जानेवारीला पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. या दिवशी देण्यात आलेल्या सुट्टीचा उपयोग मतदानासाठीच करा. मतदान हा आपला लोकशाहीतील मूलभूत हक्क आहे. त्यामुळे १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नक्की मतदान करा.
– प्रशांत दामले, अभिनेते

लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कला व संस्कृतीच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतो आणि त्यातून लोकसहभाग वाढतो, ही बाब अत्यंत सकारात्मक आहे.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका