नवी दिल्ली,दि.१०(पीसीबी) – राष्ट्रवादीचे (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे हे आज लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेले दिसले. अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना संपूर्ण भाषण त्यांनी विरोधी बाकावर बसूनच ऐकले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शेजारी बसूनच तटकरे यांनी हे भाषण ऐकले. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या अगदी समोर बसल्या होत्या.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या लोकसभेतीस पाच खासदारांपैकी सुनील तटकरे यांनीच अजित पवार यांच्या गटात सहभाग घेतला. तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि पी. पी. फैजल यांनी पवारांसोबतच राहणं पसंत केलं. अशात लोकसभेमध्ये आज अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार होते. त्यानंतर अविश्वास प्रस्वावावर मतदानही होणार होते. यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आले. यात तटकरे यांचा व्हीप मोदी सरकारच्या बाजूने होता. तर पी. पी. फैजल यांचा सरकार विरोधात व्हीप जारी करण्यात आला होता.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान, स्वतः सुनील तटकरे हेच विरोधकांच्या बाकावर बसलेले दिसून आले. त्यामुळे अजित पवार यांचे बंड आणि राष्ट्रवादीत मागील महिन्याभरात घडलेल्या घडामोडी यावर चर्चा सुरु झाली आहे.