सुनीता विल्यम्स अखेर 286 दिवसांनी पृथ्वीवर सुखरूप

0
5

दि. १९ (पी.सी.बी) : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 286 दिवसांनी पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. हे दोघंही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत.

अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत, क्रू-९ चे इतर दोन अंतराळवीर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील पृथ्वीवर परतले आहेत.

सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे गेल्या वर्षी म्हणजेच 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर पोहचले होते. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळं त्यांना तिथं 9 महिने थांबावे लागले. यानंतर त्या अखेर सहकारी बुच विलमोर यांच्यासह 286 दिवसांनी पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत.

सुनीता विल्यम्स यांनी, ‘अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला’ म्हणूनही एक नवा इतिहास रचला आहे. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्टेशनवर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पावर काम केले. यादरम्यान त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती समोर आली आहे.