दि २३ एप्रिल (पीसीबी )- भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात साडेअकरा कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विखे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. तर, तीन कोटी रूपयांचं कर्ज विखे यांच्यावर असल्याचं प्रतिज्ञापत्रावरून समोर आलं आहे.
खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार सुजय विखेंनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम आणि स्थावर अशी एकूण वैयक्तिक मालमत्ता 23 कोटी 11 लाख 40 हजार 478 रुपये असल्याचे जाहीर केले आहे. पाच वर्षांपूर्वीच्या सन 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आपली मालमत्ता 11 कोटी 17 लाख 56 हजार 439 रुपये असल्याचे उमेदवारी अर्जात नमूद केले होते. म्हणजेच पाच वर्षात त्यांच्या वैयक्तिक संपत्ती 11 कोटी 93 लाख 94 हजार 39 रुपयांची वाढ झाली आहे. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांची पाच कोटी 82 लाख 2 हजार 263 रुपये एवढी मालमत्ता जाहीर केली आहे. सुजय विखे यांच्यावर अवलंबून असल्याने दोन व्यक्तींच्या नावावर एकूण 99 लाख 26 हजार 248 रुपयांची मालमत्ता आहे.
सुजय विखे यांनी प्रतिज्ञापत्राप्रमाणे यंदाही त्यांनी स्वमालकीचे वाहन नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुजय विखे यांच्यावर 3 कोटी 64 लाख 13 हजार 209 रपये कर्ज आहे. त्यात दोन कोटी 24 लाख 13 हजार 209 रूपये प्रवरा सहकारी बँकेचे गृहकर्ज आहे. एक कोटी 40 लाख रुपये अनिशा ट्रेडिंग कंपनीकडून उसनवारीने घेतले आहे. सुजय विखे यांच्यावर कोणत्याही प्रकाराचे गुन्हे दाखल नसल्याचे म्हटले आहे.