सीसीटीव्हीच्या बॅट-या चोरणाऱ्या टोळीला अटक

0
324

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. या टोळीकडून बॅटऱ्या आणि दुचाकी वाहने असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही च्या बॅटऱ्या चोरी प्रकरणी सुहास सुरेश केसकर (वय 49, रा. रावेत) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जुनी सांगवी, पिंपळे सौदागर परिसरात रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही जंक्शन बॉक्समध्ये बॅटरी संच देखील लावण्यात आले आहेत. चोरट्यांनी नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत परिसरातील ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही जंक्शन बॉक्सचे लॉक तोडून त्यातून एकूण 68 बॅट-या आणि 11 लिंकसेट असा एकूण एक लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुण शाखेकडून केला जात होता.

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, पिंपरी येथील निराधारनगर झोपडपट्टी येथे विजय कुंदवाणी यांच्या बिल्डिंगच्या मोकळ्या पडीक जागेमध्ये दुचाकीवरून आलेले काहीजण बॅटऱ्या लपवून ठेवत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ओंकार सुरेश पवार (वय 18, रा. पिंपरी), जफर जैद सिद्धीकी (वय 20, रा. पिंपरी), गणेश भुंगा कांबळे (रा. पिंपरी) आणि त्यांच्या तीन अल्पवयीन साठीदारांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींनी सांगवी व निगडी परिसरातून सीसीटीव्ही जंक्शन मधील बॅटऱ्या चोरल्या असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून बॅटऱ्या व दुचाकी असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे निगडी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.