दि.१७(पीसीबी)-स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबरोबर शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू असलेले आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी दुसऱ्याचदिवशी पुण्यात पिंपरीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत सत्ता आणण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. त्यांनी भाजप, दोन्ही शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा त्यादृष्टीने खूप महत्वाचा आहे. सावळे या तीनवेळा इंद्रायणीनगर बालाजीनगर प्रभागातून महापालिकेत निवडून आल्या आहेत. दोनवेळा शिवसेनेकडून आणि भाजपकडून एकवेळेस निवडून आल्या आहेत.
महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आणण्यात सावळे यांचेही मोठे योगदान मानले जाते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात रान पेटविले होते. विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला होता. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर २०१७ मध्ये पहिल्यांदाच त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. सत्तेत राहून चुकीच्या कमान विरोध केल्याने त्याचा प्रशासनात दरारा कायम दरारा राहिला. कालांतराने त्यांचे भाजप नेतृत्वाशी सूर जुळले नाहीत.
२०१९ ची विधानसभेची निवडणूक अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून त्यांनी लढविली होती. आता सावळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सावळे या प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगरमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या बरोबर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी तुषार सहाने यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. सहाने यांनी २०१७ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. सीमा सावळे याच्यामुळे राष्ट्रवादीची प्रभाग ८ मधील पक्षाची ताकद वाढली आहे.











































