पिंपरी, दि. 1 (पीसीबी) :
चिंचवड मधील एका डॉक्टरला अनोळखी व्यक्तीने फोन करून तो सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. डॉक्टरच्या क्रेडिट कार्ड वरून संशयित व्यवहार झाले असून त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून 28 लाख 35 हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 नोव्हेंबर रोजी मोहननगर चिंचवड येथे घडली.
डॉ. भारत कांतीलाल शहा (वय 76, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी कुमार आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने डॉ. शहा यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी आहे असे सांगितले. डॉ. शहा यांच्या क्रेडिट कार्ड वरून एक कोटीचे ट्रांजेक्शन झालेले आहेत. त्याबाबत त्यांना सर्वोच्च न्यायालयाची आणि ईडीची खोटी नोटीस मोबाईलवर पाठवली. या प्रकरणांमध्ये डॉ. शहा यांना अटक होण्यापासून वाचायचे असेल तर वीस लाख रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. त्यानंतर इतर कारणे सांगून एकूण शहा यांच्याकडून एकूण 28 लाख 35 हजार रुपये घेत आरोपींनी त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.