पिंपरी, ४ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध योजनांची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वस्ती संसाधन केंद्र उपयुक्त ठरेल. या माध्यमातून वंचित घटकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रतिपादन समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांनी केले आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ क्षेत्रीय कार्यालयात पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि सेंटर फॉर एडवोकेसी अँड रिसर्च (सिफार) यांच्या संयुक्त विद्यमाने वस्ती संसाधन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.याच्या उद्घाटनप्रसंगी उप आयुक्त ममता शिंदे बोलत होत्या.
या उद्घाटन प्रसंगी फ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील,दिव्यांग समाज विभाग व अ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, ज्ञानेश्वर ढवळे, समाज व विकास विभागाच्या सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरगे, यार्डी च्या सीएसआर मॅनेजर दिपन्वीता सेनगुप्ता, तसेच प्रथम संस्था, प्रहार संघटना, टाटा स्ट्राईव्ह, लाईट हाऊस, मुस्कान, सारखी, एकता संघ, सीआयइ इंडिया, टेक महिंद्रा फाउंडेशन, विपला फाउंडेशन, आजीविका ब्युरो, अनुसंसाधन ट्रस्ट (साथी सेहत), काच पत्रा पंचायत या संस्थेचे प्रतिनिधी, महापालिका आणि सीफार संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक सुरक्षा, आरोग्य व नागरी सुविधा विषयक योजनांचा लाभ समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविणे, हा वस्ती संसाधन केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविध वस्ती पातळ्यांवर जनजागृती करण्यात येणार असून, नागरिकांमध्ये योजनांविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
याप्रसंगी वस्ती संसाधन केंद्राच्या उद्घाटनासोबतच, समाज विकास माहिती पुस्तकाचे अनावरण, महानगरपालिका आणि सीफार संस्थेच्या करारनामाचे हस्तांतरण देखील यावेळी करण्यात आले
कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद बाखडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक, सेंटर फॉर एडवोकेसी अँड रिसर्च यांनी केली. सूत्रसंचालन तृष्णा कांबळे आणि आभार प्रदर्शन प्रकल्प समन्वयक शंकर गवळी यांनी केले.
——
महानगरपालिका तर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी वस्ती संसाधन केंद्र काम करेल, त्याद्वारे समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपलब्ध योजना साहाय्यभूत ठरतील.
-ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग
—–
शासकीय योजना आणि लाभार्थी यांच्यामध्ये असलेली दरी भरून काढण्यासाठी, गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी वस्ती संसाधन केंद्राने काम करावे, तसेच समाजातील गरजू घटकांना माहिती, प्रचार प्रसिद्धीसह लाभाचे समायोजन करून स्वतःच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रशिक्षित करणे ही आवश्यक आहे.
अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी, फ क्षेत्रीय कार्यालय