पुणे, दि. 31 (पीसीबी)
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेला आरोपी वाल्मीक कराड हा आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला आहे. शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यानंतर पुढील काही तासांत वाल्मीक कराड MH23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओमधून १२ वाजून ५ मिनिटांनी सीआयडी कार्यालयात हजर झाला. या घटनेची माहिती राज्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर वाल्मीक कराड याचे समर्थक सीआयडी कार्यालयाबाहेर जमा झाले. याचदरम्यान अखंड मराठा समाजाच्या वतीने वाल्मीक कराड याच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सीआयडी कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. वाल्मीक कराड याची जवळपास तीन तासांपासून चौकशी सुरू आहे.
यावेळी आंदोलनकर्ते अनिकेत देशमाने म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला. तरीदेखील वाल्मीक कराड या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले. पण, अखेर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला असून, आता या आरोपीला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये आणि या हत्येमागील मुख्य सूत्रधार शोधावा. या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांना विरोधकांनी अडकवले, असा वाल्मीक कराड यांच्या समर्थकांचा आरोप आहे. वाल्मीक कराड यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून चांगले काम केले आहे. आगामी कालावधीतील निवडणुका लक्षात घेऊन बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांना विरोधकांनी विनाकारण अडकवण्यात आले आहे. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच त्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी वाल्मीक कराड यांच्या समर्थकांनी यावेळी केली.