सिलेंडर मधून धोकादायकपणे गॅस चोरी करणाऱ्यास अटक

0
391

चिखली, दि. २२ (पीसीबी) – मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये धोकादायकपणे गॅस काढून चोरी करणाऱ्या एका तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी श्रीराम कॉलनी, आहेरवाडी चिखली येथे करण्यात आली.

ऋतुराज अरुण पाटील (वय 21, रा. श्रीराम कॉलनी, आहेरवाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चंद्रशेखर चोरघे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज याने घरगुती वापराच्या सिलेंडर मधून लहान सिलेंडरच्या टाक्यांमध्ये गॅस धोकादायापणे काढून त्याची चोरी केली. त्याच्या या कृत्यामुळे स्फोट होऊन जीवितहानी होऊ शकते याची जाणीव असताना देखील त्याने असे कृत्य केले. गॅस चोरून भरलेल्या टाक्या त्याने काळ्या बाजारात विकून शासनाची व ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आहेरवाडी येथे अशा प्रकारे गॅसची चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ऋतुराज याच्या घरी धाड मारून कारवाई केली. यात पोलिसांनी दोन लाख 10 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.