सिमेंटच्या गट्टूने घाव घालून तरुणाचा खून

0
136

मोशी, दि. १२ (पीसीबी) – सिमेंटच्या गट्टूने डोक्यात घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केला. मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. १०) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

केतन निवृत्ती कोंढाळकर (वय २७, रा. पिंपरीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस हवालदार संदीप मांडवी यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ११) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी येथे एक अनोळखी मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवली. केतन कोंढाळकर याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. अज्ञाताने सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून केतन याचा खून केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून देखील संशयिताचा शोध सुरू आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.