सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात शार्पशटर महाकाळला अटक

0
259

पुणे, दि. ८ (पीसीबी) : पंजाबी गायक व काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर आठ शार्पशूटर्सनी गोळीबार केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचे कनेक्शन असल्याचे दोन दिवसांपूर्वी पुढे आले होते. पुण्यातील दोन गुंडांचा या हत्याकांडाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सौरव महाकाळ याला अटक केली आहे.

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शार्पशूटरपैकी तीन पंजाबचे असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय हरयाणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि राजस्थानमधील एक आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी हरयाणातून मारेकऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत हरयाणातील तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे. गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

बुधवारी (ता. ८) सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे महाराष्ट्र कनेक्शन दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. हत्याकांडातील दोन मारेकरी पुण्यातील असल्याचे बोलले जात होते. यातील सौरव महाकाळला आज अटक करण्यात आली.