सिगरेट पिऊन दाखवते ती बाई आम्हाला काय शिकवणार ?

0
288

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, अनेकदा दोन्ही बाजूंनी टीका करताना पातळी सोडली जात असल्याचंही दिसून येत आहे. असाच एक प्रकार सध्या घडताना दिसत असून अमरावतीमधील खासदार नवनीत राणा आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे. आधी नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर त्यावर चंद्रकांत खैरेंनी देखील एकेरी भाषेतच प्रत्युत्तर दिलं आहे.

जळगावमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. मात्र, टीका करताना राणा यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

“मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. एवढी कमजोर नाही. जर तू शिवसेनावाला आहे, तू उद्धव ठाकरे आहे, तर मीही राणा आहे. मी विदर्भाची सून आहे. तुमच्याच किती ताकद आणि माझ्यात किती ताकद याचा सामना होऊनच जाऊ दे. आम्ही त्यांना अशी जागा दाखवली, की त्यांच्या घरात उभा राहणारा कार्यकर्ताही उरला नाही”, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. “ती बाई म्हणजे तुम्हाला माहितीये चित्रपटात कशी सिगरेट पिते. फोटो कसे काढते. कसे कपडे असतात. ती बाई काय बोलणार? सिगरेट पिऊन दाखवते ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती बाई हनुमान चालिसाविषयी आम्हाला शिकवते का?” अशा शब्दांत खैरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.