सिंधुदुर्गचे न्यायमूर्ती उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार

0
312

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार हे स्पष्ट झालं आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट) देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी स्वतः गुरुवारी (४ ऑगस्ट) केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या ३ ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली.

केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून ३ ऑगस्टला सरन्यायाधीशांच्या सचिवालयाला सरन्यायाधीशपदासाठी पुढील उत्तराधिकारी निवडण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता. यानंतर प्रथेप्रमाणे सरन्यायाधीश रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत यांच्या नावाची शिफारस केली. एन. व्ही. रमणा २६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. तेही ८ नोव्हेंबरला निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील.

कोण आहेत उदय लळित
हायप्रोफाईल केसमध्ये सहभाग विशेष सरकारी वकील असलेले उदय लळीत यांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणे चालवली असूनही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत.80 हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम‘ (2 G spectrum) हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालवला. एवढेच नाही तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.

न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्‍याचे सुपुत्र असून गिर्ये ‘कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर येथे आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंबीय या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय कुंभवडे, पेंढरी, ‘हरचेरी चुना-कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ आपटे या गावांमध्ये स्थलांतरित झाले.

वकिलीचा पिढीजात वारसा
लळीत यांचे आजोबा, चार काका, वडील वकिली करायचे. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीला गेले. सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.