सिंघम आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर

0
2

पटणा, दि. 16 (पीसीबी)
महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले सिंघम आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले शिवदीप लांडे यांचा राजीनामा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लांडे यांचा राजीनामा मंजूर केला. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 13 जानेवारी 2025 पासून तत्काळ प्रभावाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. पोलीस अधिकारी म्हणून त्यांची सेवा आता समाप्त झाली आहे. शिवदीप पांडे हे अकोला जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ते बिहारमधील पूर्णिया विभागात आयजी म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना पटण्यात बोलवण्यात आले होते.
गृहमंत्रालयाकडून अधिसूचना

शिवदीप लांडे यांची ओळख बिहारमधील सिंघम म्हणून झाली. त्यांच्या ज्या ठिकाणी पोस्टींग झाली त्या ठिकाणी ते बातम्यांचे विषय बनले. आपल्या कामगिरीचा ठसा त्यांनी उमटवला. गुन्हेगारांना जबरदस्त धडा शिकवला. त्यामुळे युवक त्यांना आदर्श मानून आयपीएसची तयारी करु लागले. ते अनेक तरुणांनी मार्गदर्शनही करत राहिले.

शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. अनेक महिने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती फेसबूकवरुन शेअर केली होती. शिवदीप लांडे यांचा राजीनामा बिहार सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता त्यांचा राजीनामा मंजूर केल्याची अधिसूचना गृहमंत्रालयाने काढली. शिवदीप लांडे हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. त्यानंतर त्यांना बिहारमध्ये परत बोलवण्यात आले. बिहारमध्ये आल्यानंतर त्यांना आयजी म्हणून पदोन्नती देण्यात आली.
शिवदीप लांडे पुढे काय करणार?

शिवदीप लांडे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता ते पुढे काय करणार? यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. ते राजकारणात येणार असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. परंतु ते महाराष्ट्रात परत येणार नाही, बिहार हिच कर्मभूमी म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील अकोल जिल्ह्यातील असलेले शिवदीप लांडे बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. ते मुझफ्फरपूरमध्ये जितके लोकप्रिय आहेत तितकेच पटनामध्येही आहे.
अकोला जिल्ह्यात मोठे काम

सामान्य शेतकरी वर्गातील असलेले शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यात झाला. त्यांचा विवाह २ फेब्रुवारी २०१४ रोजी ममता शिवतारे यांच्याशी झाला. त्यांना आरा नावाची मुलगी आहे. ते आपल्या पगारातील ६० ते ७०% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात