साहेबांच्या राष्ट्रवादीचे भले मोठ्ठे कार्यालय, नेते-कार्यकर्ते कुठंय ? थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
623

भाजपने सत्तेच्या राजकारणासाठी दीड वर्षांपूर्वी शिवसेना फोडली आणि सहा महिन्यांपूर्वी शरद पवार यांची राष्ट्रवादी गळाला लावली. साठ वर्षांच्या आपल्या राजकारणात रथीमहारथींना लोळवणाऱ्या आणि तमाम विरोधकांना धोबीपछाड केलेल्या पवार साहेबांची राष्ट्रवादी दुभंगली. धक्कादायक म्हणजे काकांना थेट घरातूनच आव्हान मिळाले. लोक म्हणून लागले, जे पेरले तेच उगवले. आता तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकिलाही दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने ठाकणार आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख म्हणतात, भाजपने आतापासूनच अजितदादांना साईडट्रॅक केलयं, लोकसभा निवडणुकिनंतर वेगळेच चित्र दिसेल. दरम्यान, दादांच्या राष्ट्रवादीचा पहिलाच जाहीर मेळावा आज कर्जत-खालापूर तालुक्यात झाला. सुनिल तटकरेंनी साहेबांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. तिसरीकडे राष्ट्रवादी कोणती खरी कोणती खोटी यावर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे तर, घड्याळ चिन्ह कोणाचे त्याचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे. सगळेच राजकारण अगदी बेभरवशाचे झाल्याने तमाम पवार प्रेमी कार्यकर्ते कुंपणावर बसून आहेत. पहाटेच्या शपथविधीने दादा कधी काय निर्णय घेतील याचा भरवसा नाही आणि इतके महाभारत घडले असूनही काका-पुतणे थेट भिडताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत आपण कुणाची पालखी खांद्यावर घ्यायची याच द्विधा मनस्थितीत आजही हजारो कार्यकर्ते आहेत. साहेबांचे योगदान कमी लेखता येत नाही आणि दादांचा झपाटा, कार्यक्षमतेची कोणाबरोबर तुलनाच होऊ शकत नाही. हे सगळे असले तरी किमान पुणे जिल्ह्यात आज दादांचे पारडे जड दिसते. मतलबी लोक मावळत्या नव्हे तर उगवत्या सुर्याला नमस्कार करतात, हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे पुणे काय किंवा पिंपरी चिंचवड काय दोन्ही शहरात आणि ग्रामिण भागातही दादांचीच चलती आहे. जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड असताना सलग पाच वेळा साहेबांना मते देणारे आज दादांकडे झुकलेत. कारण १९९२ पासून जातीने लक्ष घालून दादांनी शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवला. होय, एमआयडीसीचा विस्तार, चाकण-तळेगाव-रांजणगाव इंडस्ट्री, हिंजवडी, तळवडे, खराडी आयटी पार्क तसेच स्मार्ट सिटी ही सर्व शरद पवार यांची देणं आहे, हे लोक विसरले असतील पण तेच सत्य आहे. कारखानदारी आणि कामगार वाचवण्यासाठी दादांचा शब्द कधी कामी आला नाही, तर तिथे साहेबांचेच वजन खर्ची पडले. प्राधिकरणातील शेतकऱ्यांना एकरी पाच गुंठ्याचा परतावा साहेबांनीच दिला. एचए कंपनी बंद पडली असती पण केंद्रातून २५० कोटींची मदत आणून ती वाचवली तीसुध्दा शरद पवार यांनीच. या शहराचे नेतृत्व करणारे खासदार, आमदारसुध्दा बारामतीकर काकांच्याच तालमित घडले. इथल्या कुस्ती, कब्बडीला आणि तमाम पहिलवानांना खुराकासह मोठे केले, मैदान उपलब्ध करून दिले तेसुध्दा साहेबांनीच. तीस वर्षांत एकाही विरोधकाला इथे तोंड काढून दिले नाही त्याचेही श्रेय पवार साहेबांचेच. मात्र, काळ बदलला आहे. जुनी पिढी अर्धीअधिक आज काळाच्या पडद्याआड गेली. आज झटमांगे पट शादीचा जमाना आहे आणि दादा त्यांचाच चेहरा आहेत. शहराची रेषन रेष, चौक, गल्ली आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांपासून तमाम माजी नगरसेवकांची कुंडली दादांना आज तोंडपाठ आहे. उद्या महापालिकेची निवडणूक लागलीच तर त्यांना साहेबांपेक्षा दादा सोयिचे वाटतात. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर तीन महिने साहेबांच्या राष्ट्रवादीला शहराध्यक्ष मिळत नव्हता ही शोकांतिका आहे. आजही पदाधिकाऱ्यांची नावे समोर आणली तर स्वतःच्या जीवावर तीन-चार नगरसेवक निवडूण आणू शकेल असे चेहरे साहेबांच्या राष्ट्रवादीकडे दिसत नाहीत. महापालिकेवर २० महिन्यांत प्रशासकीय राजवटीत प्रचंड लूट सुरू आहे, पण साहेबांची राष्ट्रवादी तिथे तुटून पडली असे झालेले नाही. पक्ष संघटना वाढवायचीच तर सतत चार्ज पाहिजे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारावर मोर्चे, आंदोलने, निदर्शने झाली पाहिजेत. सहा महिन्यांत अपवाद वगळता ते चित्र दिसले नाही. साहेब-दादांचे खरोखरचे भांडण आहे की फक्त नुरा कुस्ती आहे याबाबत आजही तमाम नेते आणि कार्यकर्तेसुध्दा संभ्रमात आहेत. सत्तेला सलाम करणारे दादांची पालखी वाहतात आणि निष्ठेच्या गुंत्यात गुरफटलेले साहेबांची वाट पाहत आहेत. भाजपने पाच वर्षांत जो शेकडो कोटींचा भ्रष्टाचार पालिकेत केला त्यावर आता दादांची राष्ट्रवादी तोंड उघडणार नाही. अशा वेळी साहेबांच्या राष्ट्रवादीने ही संधी समजून रान पेटवले पाहिजे, पण तिथेही बोटचेपेचे धोरण दिसते. कामे व्हायची असतील तर नेहमी सत्तेची कास धरून चाला, हा मोठ्या साहेबांचाच कानमंत्र असल्याने गर्दी आणि दर्दीसुध्दा दादांच्या राष्ट्रवादीकडे गेलेत.

पिंपरी चिंचवड शहरात साहेबांची राष्ट्रवादी मोठी करायची तर एकटे तुषार कामठे, रविकांत वर्पे किंवा सुनिल गव्हाणे हे नवखे पुरेसे नाहीत. माजी महापौर आझमभाई पानसरे यांची ताकद आहे, पण मावळत्या नगरसेवकांपैकी एकही नाव यादीत दिसत नाही याची खंत आहे. लोकांमधले वजनदार चेहरे मोहरे फलकावर पाहिजेत. मावळात किंवा शिरुरमध्ये लोकसभा लढायची तर आताचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे सोडून एकही तोलामोलाचे नाव समोर यायला तयार नाही. विधानसभेचे तीन मतदारसंघात उद्याचा उमेदवार कोण असा प्रश्न आला तर एकही चर्चेतील नाव सांगता येत नाही. महापालिकेच्या १२८ जागांवर उमेदवार द्यायचेच म्हटले तर आज घडिला २८ नावेसुध्दा सापडणार नाहीत. साहेबांची पुण्याई आता कामाला येणार नाही, त्यासाठी घाम गाळावा लागेल. हे चित्र बदलायचे तर वेळ कमी आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारा विरोधात नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी रेकॉर्डब्रेक मोर्चा काढून घाम फोडला होता. पक्ष दुभंगल्यानंतर अलिकडेच प्रशासकीय काळातील विकास कामांत टक्केवारी, भागीदारीचा जो प्रचंड राडा प्रशासनाने केला त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून स्वतः अजितदादांनी महापालिकेत बैठक घेतली आणि तंबी दिली. किमान त्यातून एक वातावरण निर्मिती झाली. साहेबांच्या राष्ट्रवादीकडून आमदार रोहित पवार यांचा एक दौरा सोडला तर कुठली हालचाल दिसली नाही. अजितदादा येणार म्हटले की कार्यकर्त्यांचे मोहळ येते आणि पक्षात वेगळे चैतन्य निर्माण होते. साहेबांच्या राष्ट्रवादीकडून एकाही प्रश्नावर आवाज उठवल्याचे कोणी पाहिलेले नाही. प्रशासनात सद्या दोन-अडिच हजार कोटींचा एक मोठा घोटाळा फक्त चर्चेत आहे, वाटले होते साहेबांची राष्ट्रवादी तुटून पडेल. आजही सर्व कसे शांत शांत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी म्हणजे २ डिसेंबरला साहेबांच्या राष्ट्रवादीसाठी उघडण्यात येणाऱ्या प्रशस्त पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आहे आणि मेळावासुध्दा होणार आहे. खरे तर, या निमित्ताने साहेबांच्या हितचिंतकांनी आज आपण नेमके कोठे आहोत यावर चिंतन केले पाहिजे. शिरुर लोकसभा मतदारसंघात आजच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जर का माळी-मराठा वादाचे वावटळ शिरलेच तर डॉ. कोल्हे यांची अनामत शिल्लक राहणार नाही. स्वतः डॉ. कोल्हे हे उत्तम वक्ते आहेत, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे खासदार आहेत यात दुमत नाही. त्यांच्या सारखेच लोकप्रतिनिधी ही आजच्या काळाची खरी गरज आहे, हेसुध्दा मान्य. जातीपातीच्या राजकारणात इथे डॉ. कोल्हेंसारखा विद्यवान नेता जिंकूण आणायचे काम कठिण आहे. मावळात आणि शिरुर लोकसभेला आज परिस्थितीत विधानसभा निहाय विचार केला तर साहेबांच्या राष्ट्रवादीकडे तोडीस तोड अशा उमेदवारांची कमी आहे. गांभीर्याने घ्या आणि कामाला लागा अन्यथा काळ कठिण आहे.