पिंपरी, दि. १८ (पीसीबी) -साहित्य व साहित्यिक चळवळ क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांना मातंग साहित्य परिषद तर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते ‘विशेष साहित्य सन्मान ‘ प्रदान करण्यात आला. राजभवन मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय समरसता मंडळाचे सदस्य रमेश पांडव, ह.भ.प.शिवाजीराव मोरे,डॉ.धनंजय भिसे, डॉ.अंबादास सगट उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.पिंपरी चिंचवड मधून लाखे यांना हा मान मिळाला.राजन लाखे यांचे पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिक वाटचालीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी काव्यपहाट, साहित्यिकांची आरोग्य तपासणी हे कार्यक्रम प्रथमच सुरु केले तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनातील ‘कविकट्टा’ या व्यासपीठावर १०२४ कवींना स्थान देऊन साहित्य क्षेत्रात विक्रम केला. पूर्णपणे साहित्याला वाहिलेला ‘अक्षरवेध’ हा दिवाळी अंक सुरु केला. कोरोनाच्या काळात म.सा.प च्या माध्यमातून सर्वाधिक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राच्या नकाशावर पिंपरी चिंचवडला प्रथम क्रमांकावर आणले. याचे फलित म्हणजे मसाप पिंपरी चिंचवड शाखेला ‘सर्वोत्कृष्ठ शाखा पुरस्कार’ दुस-यांदा प्राप्त झाला.
कवयित्री शांता शेळके यांचा जन्मशताब्दी महोत्सव , १०० मान्यवर, १०० आठवणी, १०० कविता याद्वारे मानवंदना देऊन साहित्य क्षेत्रात यापूर्वी कधीही न झालेला असा अभिनव तसेच ऐतिहासिक उपक्रम ते राबवित असून हा उपक्रम सोशल मिडिया च्या माध्यमातून जगभरातील तमाम रसिकांपर्यंत पोहचवत आहेत. या उपक्रमाची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस ‘ने दखल घेतली आहे.