पिंपरी (दिनांक : ०७ जानेवारी २०२५) “साहित्यातून सामाजिक एकोपा निर्माण व्हावा!” असे आवाहन निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. माधव सानप यांनी रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात भूमिपुत्र २०२४ पुरस्कार प्रदान करताना डॉ. माधव सानप बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, पिंपरी – चिंचवड महापालिका विज्ञान केंद्र संचालक प्रवीण तुपे, संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
रामदास काकडे यांनी, “इंद्रायणी साहित्य संमेलनातून परिसरातील विविध गावांतील ऋणानुबंध अधिकच दृढ झाले आहेत!” असे मत व्यक्त केले. प्रभाकर ओव्हाळ यांनी, “गावकुसाबाहेरील साहित्यिकांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रवीण तुपे यांनी, “इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून औद्योगिकनगरीत साहित्य अन् सांस्कृतिक बाबींचे अभिसरण होत आहे!” असे गौरवोद्गार काढले; तर राजन लाखे यांनी, “कार्यकर्ते हे कोणत्याही यशस्वी सोहळ्याचे खरे पाठबळ असते!” अशी भावना व्यक्त केली. अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. वंदना आल्हाट यांनी स्वागत केले.
याप्रसंगी प्रदान करण्यात आलेल्या ‘भूमिपुत्र पुरस्कार २०२४’ मध्ये डॉ. अनिलकुमार रोडे (वैद्यकीय सेवा), संजय गोपाळ शिंदे (प्रशासकीय सेवा), दत्तात्रय दगडू फुगे (इतिहास संशोधन), सुनील तानाजी गिलबिले (अग्निशमन सेवा), स्मिता प्रतीक थोरवे (प्रशासकीय सेवा परीक्षेत यश), अनुज काळुराम गावडे (प्रो कबड्डी), डॉ. मधुरा मल्हारी काळभोर (वैद्यकीय संशोधन), ह. भ. प. विठ्ठल गवळी (युवा कीर्तनकार), ह. भ. प. संग्राम बापू भंडारे (समाज प्रबोधन), ह. भ. प. मंगेश सावंत (युवा प्रवचनकार), दत्तात्रय विघ्नहर अत्रे (साहित्य), कुमार सम्यक राहुल धोका आणि कुमार सिद्धान्त राहुल धोका या जुळ्या भावांना सी. ए. परीक्षेतील यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. याचबरोबर तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या महाराष्ट्र गडकिल्ले सेवा संस्था, जयवंत दत्तात्रय फाळके, गणेश बबन सस्ते, परेश भगवंत सस्ते, नीलेश मधुकर नेवाळे, हिरामण निवृत्ती सस्ते, स्वप्निल वासुदेव जाधव, ज्ञानेश्वर दत्तोबा बोऱ्हाडे, गणेश शशिकांत सस्ते, निखिल शिवाजी बोऱ्हाडे या संस्था आणि व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पहिल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष संतोष सीताराम बारणे, दुसर्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष गणेश साहेबराव सस्ते तिसऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष वंदना हिरामण आल्हाट यांना गौरविण्यात आले.
पुरस्कारार्थींच्या वतीने स्मिता थोरवे, संजय शिंदे, सुनील गिलबिले, विठ्ठल गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि मोशी ग्रामस्थ यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२