सासू, मेहुण्याला जावयाची मारहाण

0
3

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

काळेवाडी, दि. २२ (प्रतिनिधी)
मुलीसोबत भांडण केल्याने सासू जावयाच्या घरी जाब विचारण्यासाठी आली असता जावयाने सासू, दोन मेहुणे आणि मेहुणी यांना मारहाण करून जखमी केले. तसेच सासू, दोन मेहुणे आणि मेहुणी यांनीही जावयाला मारहाण केली. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १६ डिसेंबर रोजी थेरगाव येथे घडली.

स्वाती मारुती साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती मारुती महादेव साळुंके (वय ३७, रा. काळेवाडी) आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती यांची आई, बहीण आणि दोन भाऊ हे स्वाती यांना मारुती याने मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आले होते. त्यावेळी मारुती याने त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच कोयत्याने ठार मारण्याची धमकी दिली.

याच्या परस्पर विरोधात मारुती महादेव साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन बबन कांबळे (वय २६), प्रसाद बबन कांबळे (वय २८) आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती आणि त्यांच्या पत्नीचे घरगुती किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून मारुती यांचा मेहुणा रोहन आणि प्रसाद, सासू आणि मेहुणी यांनी मारुती यांच्या घरात येऊन त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासूने मारुती यांना पकडून ठेवत मेहुण्याने लाकडी दांडके डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी मारुती यांना जीवे मारण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.