सावित्रीबाई फुले स्मारकात प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु होणार; प्रशासकांची मान्यता

0
203

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे नव्याने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येणार आहे. त्याकामी येणा-या खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी (मंगळवारी) प्रशासकीय मान्यता दिली.

स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 25 कोटी 47 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना आजच्या बैठकीत प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रशासक पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने पिंपरी चिंचवड प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येणार आहे. या संस्थेत 100 विद्यार्थ्यांना पूर्वपात्रता परीक्षा घेऊन प्रवेश देणे, एसआयएसी परिक्षेत पास होणा-या 50 विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पातळीवर परिक्षा घेऊन 50 विद्यार्थ्यांची निवड करणे अशी या केंद्राची प्रक्रीया असणार आहे.

या केंद्रासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ, पुस्तके, नियतकालिके, नकाशे आणि साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक, व्याख्याते आणि परिक्षकांची तासिका पध्दतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. ठाणे येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे याकामी मार्गदर्शन आणि सहकार्य घेण्यात येणार आहे. तज्ञांना मानधसुध्दा अदा केले जाणार आहे. प्रशासकीय केंद्राची रचना आणि कार्यप्रणाली यासाठी आवश्यक खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

बालेवाडी येथे होणा-या ग्रॅन्डमास्टर बुध्दीबळ स्पर्धेसाठी महापालिका सह आयोजकत्व घेणार आहे. या विषयासही मान्यता दिली. महापालिका प्रशासकीय इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणेचे चालन देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणा-या 47 लाख रुपये खर्चास, उद्यान वृक्षसंवर्धन विभागासाठी इलेक्ट्रीक श्रेडर मशिन घेणेकामी 9 लाख 92 हजार रुपये खर्चास, महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी, आकुर्डी आणि जिजामाता रूग्णालयाचे स्थायी अग्रीमधन प्रत्येकी 50 हजार रुपये करण्यास, महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके खरेदीकामी 17 लाख 64 हजार रुपये खर्चास, सुधारीत विकास योजना पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयास संगणक संच आणि जीआयएस सॉफ्टवेअर खरेदी करण्याकामी 30 लाख 82 हजार रुपये खर्चास प्रशासक मान्यता दिली.

प्रभाग क्र. 6 मधील धावडेवस्ती, गुळवेवस्ती,भगतवस्ती, चक्रपाणी वसाहत, लांडगेवस्ती, सद्गुरूनगर, महादेवनगर, मोहननगर आणि उर्वरित भागातील जुन्या मलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे तसेच आवश्यकतेनुसार नविन ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. याकामी 31 लाख 36 हजार रुपये खर्चास आणि विविध विभागांच्या लेखाशिर्षातील तरतूद वर्गीकरणास मंजुरी दिली.