सावित्रीबाई फुले अकादमीच्या संचालकपदासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी अर्ज करावा; महापालिकेचे आवाहन

0
230

16 जुलै रोजी होणार मुलाखती

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या  सावित्रीबाई फुले अकादमी  या संस्थेसाठी  संचालक म्हणून सेवानिवृत्त शासकीय अधिका-याची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक सेवानिवृत्त शासकीय अधिका-यांकडून अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या जाणा-या नागरी सेवा परीक्षांना बसणा-या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे सन 2022-23 पासून नव्याने सावित्रीबाई फुले अकादमी सुरु करण्यात येत आहे. संचालक या एका पदसाठी 6 महिने कालावधीकरीता करार पद्धतीने मानधन तत्वावर सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, तज्ञ यांची निवड करण्यात येणार आहे. ही निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.  16 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता  महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील आयुक्त यांच्या दालनात ही मुलाखत पार पडणार आहे.

सावित्रीबाई फुले अकादमी संचालक पदासाठी काही अटी शर्ती पूर्तता करणे आवश्यक असणार  आहे.  यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी  तसेच एमपीएससी परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक असणार आहे.  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी अथवा  कर्मचा-याचे वय 65 पेक्षा अधिक नसावे, स्वेच्छा निवृत्ती किंवा सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांचा सेवानिवृत्त झाल्याचा कालावधी 7 वर्षापेक्षा अधिक नसावा. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, त्यांच्या विरुध्द त्यांच्या शासकीय सेवा कालावधीत कामकाजाबाबत कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशीची कारवाई चालू अथवा प्रस्तावित नसावी. तसेच अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नसावे. ग्रेड पे 5 हजार चारशे अथवा 6 हजार सहाशे  संवार्गीय सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी असणे आवश्यक असणार आहे.  यासाठी स्पर्धा परीक्षा संबंधी ज्ञान असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.  करार पद्धतीने निवड करवयाच्या अधिकारी यांनी विहित नमुन्यात वचनपत्र भरून देणे आवश्यक असणार आहे.

 संचालक, सावित्रीबाई फुले अकादमी पदासाठीची संपूर्ण माहिती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर अटी व शर्ती सह प्रसिद्ध करण्यात आली आहे.  तसेच संकेत स्थळावर संपूर्ण तपशील व अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला असून उमेदवाराने अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी 16 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता  महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील आयुक्त यांच्या दालनात अर्ज, संबंधित मुळ प्रमाणपत्र व संबंधित प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.