सावरदरी दुहेरी हत्याकांडातील आरोपींना सिनेस्टाईल पध्दतीने अटक

0
277

पुणे, दि. १५ (पीसीबी) : चाकण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा अखेर छडा लावला आहे. चाकणमध्ये दोघांची हत्या करुन आरोपी वाशिमच्या जंगलात पसार झाला होता. जंगलात लपून बसलेल्या आरोपीचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोध घेत त्याला अटक केली. बिल्डिंगमध्ये येऊ न दिल्याच्या रागातून हे दुहेरी हत्याकांड घडलं असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. वाशिममध्ये चाकण पोलिसांचं पथक जंगलात गेलं आणि तिथूनच मारेकरी असलेल्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतीत सावरदरीगावात भक्ती अपार्टमेंट आहे. या अपार्टमेन्टमध्ये सूरज चव्हाण आणि अनिकेत पवार यांच्याशी प्रदीप दिलीप भगत याचा वाद झाला होता. आपआपसातील वादातून प्रदिप दिलीप भगत (वय 21 वर्ष, रा. सावरदरी, मुळगाव मंगळूरपीर. जि. वाशिम) याने 8 ऑक्टोबरला चाकूच्या सहाय्याने सूरज आणि अनिकेतला भोसकलं आणि त्यांची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी होंडा शाईन मोटार सायकल वरून पळून गेला.

या दुहेरी हत्याकांड प्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाकण औद्योगीक परिसरात झालेला दुहेरी खूनाची पोलिसांनी गंभीर दखळ घेतली. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट 3 कडील आणि पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड तसंच पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना तपासकामी सूचना देण्यात आल्या होत्या.आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली होती. एक पथक घटनास्थळावरील परीसरात सदर आरोपीचे संपर्क असणारे त्याचे नातेवाईक मित्र यांना ताब्यात घेऊ त्यांची चौकशीकरत होतं. आरोपी हा त्याच्या मूळगावी गेला असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. ही माहीती मिळताच पोलिसांचे एक पथक वाशिम येथे रवाना झालं.

आरोपीचे मूळ गावी गिभा, ता. मंगळूरपीर, जिल्हा वाशिम इथं पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपीच्या रहात्या घराचा शोध घेतला. तिथे आरोपीचा भाऊ निलेश दिलीप भगत (वय 22 वर्ष) आणि आरोपीचा मामेभाऊ रोशन सुरेश इंगवले (वय 23 वर्ष, रा. रूई ता. मानोर, जि.वाशिम) यांना विश्वासात घेतलं. त्यानंतर आरोपी बाबत चौकशी करण्यात आली.

प्रदिप भगत हा पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मामाचे गावी रूई ता. मानोर जि. वाशिम इथं राजू वसंत इंगवले यांच्या शेताच्या तांड्यामध्ये लपून बसला होता. पोलिसांना चौकशीतून ही बाब कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने आरोपी प्रदीप याला अटक केली.
चाकण पोलिसांनी या ठिकाणी शोध घेत असताना तो तेथील जंगला मध्ये पळून गेला. तपास पथकाने त्याचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने जंगल परीसरात रात्रभर शोध घेतला. पण आरोपी पोलिसांना चकवा देत होता. मात्र पोलिसांनी जंगलामध्ये शोध सुरूच ठेवून आरोपी प्रदिप दिलीप भगत यास शिताफिने ताब्यात घेतले.

आरोपी प्रदीपकडे तपास केला असता मोठा खुलासा या दुहेरी हत्याकांड प्रकरणी झाला. सूरज चव्हाण आणि अनिकेत पवार यांनी त्यांच्या बिल्डींगमध्ये येण्यास विरोध केल्यानं आपण त्यांची हत्या केली, अशी कबुलीदेखील प्रदीपने दिली.