सावरकर मंडळाच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी प्राप्त केले अभिमानास्पद यश

0
5

पिंपरी, दि. १७ -निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनातून तसेच
राइज अबव्ह या संस्थेच्या सहकार्याने ए एफ सी ए टी (AFCAT) अर्थात एअर फोर्स काॅमन ॲडमिशन टेस्ट
आणि सी डी एस ई (CDSE) अर्थात कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम या भारतीय संरक्षण सेवांमध्ये अधिकारीपदाच्या अभ्यासक्रमात अनुक्रमे प्रतीक्षा सावंत आणि हर्ष कांबळे या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

विशेष बाब म्हणजे अशा अभ्यासक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राइज अबव्ह या संस्थेमार्फत प्रशिक्षित करण्यात आलेली ही पहिलीच तुकडी (बॅच) होती. यासाठी सैन्यदलातील माजी अधिकारी आणि एस एस बी बोर्डाचे माजी अध्यक्ष ब्रिगेडियर बलजितसिंग गिल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले; तसेच अमित यादव, अक्षय ताटे, संकेत साळुंके, फाल्गुनी सामदेकर, अश्विनी पेटकर या शिक्षकवृंदाने या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले होते. याशिवाय २०१७ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ केंद्रीय लोकसेवा आयोग (यू पी एस सी) आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन डी ए) यासाठीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करीत असून त्या माध्यमातून अकरावी आणि बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या अभ्यासक्रम पूर्ण करून भारतीय संरक्षण दलात स्थान मिळविले आहे. यापूर्वी २०२२ च्या भारतीय तुकडीत सावरकर मंडळाच्या विघ्नेश कदम या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश प्राप्त केले होते.

गेल्या वर्षभरापासून प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राइज अबव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या
ए एफ सी ए टी आणि सी डी एस ई अभ्यासक्रमाला उत्तम यश मिळाल्याने मंडळाच्या प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करून या उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना भारतीय संरक्षण सेवांमध्ये अधिकारी म्हणून करिअर घडविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक, मानसिक व शारीरिक मार्गदर्शन मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या यशामुळे आणखी अनेक विद्यार्थी संरक्षण सेवांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित होतील, असा विश्वास व्यक्त करून आगामी बॅचसाठी नोंदणी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.