पुणे, दि. २५ (पीसीबी) – पुण्यात आता कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने शिरकाव केला आहे. कोरोनाचा नवा व्हेरीयंट जेएन.1 चे तीन रुग्ण आढळले आहे. त्यात पुणे महापालिका हद्दीतील दोन तर पुणे ग्रामीण परिसरातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता पुणेकरांना या नव्या व्हेरियंटचा धोका दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात आढळेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून, तो अमेरिकेहून परतल्याचे समोर आले आहे.
राज्यात 9 रुग्णांची नोंद
करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन.1च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
“राज्यात सापडलेल्या जेएन.1 च्या नऊ रुग्ण आढळले आहेत त्यातील आठ रुग्णांनी कोविडच्या लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्यांमध्ये जेएन 1 व्हेरियंटचे तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृतीतदेखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभाग सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी सांगितलं आहे.
नवीन JN.1 कोरोना व्हेरियंटने चिंता वाढवली
कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. JN.1 व्हेरियंटमुळे कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं मानलं जातं आहे. नवीन JN.1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंच आहे. JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट JN.1 चा रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
खबरदारी म्हणून मास्क वापरा
देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतोय. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र सध्या सुट्टीचे दिवस असल्याने नागरीक पर्यटनसाठी बाहेर पडत असल्याने खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक, इतर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे तसेच गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलंय.