सावधान, गुन्‍हेगारांच्या पोस्‍ट्सवर लाइक, कमेंट करणे पडाणार महागात

0
3

पिंपरी, दि. 1३ (पीसीबी) : गुन्‍हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या अल्‍पवयीन मुलांना आणि नवतरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी आता आपला वाॅच वाढविला आहे. सोशल मीडियावर देखील पोलीस एक्टीव्ह झाले आहेत. गुन्‍हेगारांच्‍या अथवा गुन्‍हेगारीला प्रोत्‍साहन देणाऱ्या पोस्‍ट्सवर लाइक, कमेंट करणे देखील अनेकांना महागात पडणार आहे.

सराईत गुन्‍हेगाराने सोशल मीडियावर केलेल्‍या पोस्‍टला लाइक, कमेंट करणार्‍यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या उभारत्‍या गुन्‍हेगारांना बोलावून पोलीस आपल्‍या भाषेत समज देत आहेत. आपल्‍या टोळीची प्रसिद्धी व्हावी यासाठी सराईत गुन्‍हेगार व त्‍याच्‍या टोळ्या सोशल मीडियावरून विविध पोस्‍ट टाकत असतात. पोलिसांचा या टोळ्यांवर वॉच असतोच. मात्र गुन्‍हेगारांनी टाकलेल्‍या पोस्‍टला कोण कोण लाइक आणि कमेंट करतात, यावरही पोलिसांचे लक्ष आहे. पोलीस आयुक्‍तालयात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्‍यासाठी स्‍वंतत्र कक्ष कार्यान्‍वित करण्‍यात आला आहे.

ज्‍या तरुणांनी कधीही गुन्‍हा केलेला नाही. मात्र त्‍यांच्‍या मनात आपणही भाई व्‍हावे, अशी सुप्‍त इच्‍छा असते. त्‍यामुळे हे उभरते गुन्‍हेगार मोठ्या गुन्‍हेगारांना फाॅलो करीत असतात. त्‍यांच्‍या पोस्‍टला लाइक आणि कमेंटही करीत असतात. भविष्‍यात त्‍यांच्‍याकडूनही अशा प्रकारचे गुन्‍हे घडण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे अशा उभरत्‍या गुन्‍हेगारांवर लक्ष ठेवण्‍यासाठी पोलीस ठाण्‍यानुसार यादी तयार करण्‍यात आली आहे. यादीतील उभरत्‍या गुन्‍हेगारांना बोलावून पोलीस त्यांच्या भाषेत योग्‍य ती समज देत आहेत.

सराईत गुन्हेगारांना पोलीस करताहेत फाॅलो –
एवढेच नव्‍हे तर सराईत गुन्‍हेगारांच्‍या मोबाइल फोनची यादीही पोलिसांनी सोशल मीडिया कक्षाकडे दिली आहे. कोणता गुन्‍हेगार कोणते स्‍टेटस्‌ ठेवत आहे, याचीही दररोज माहिती घेतली जात आहे. जर कोणी धमकी देणारे किंवा आक्षेपार्ह स्टेटस्‌ ठवेले तर गुन्‍हे शाखेचे पोलीस या सराईत गुन्‍हेगारास बोलावून त्‍याच्‍यावर प्रतिबंधात्‍मक कारवाई करतात. नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीची तयारी पोलिसांनी लोकसभा निवडणुकीपासूनच केली होती. त्‍यामुळे ज्‍याच्‍यावर एक जरी गुन्‍हा दाखल आहे त्‍या सर्वांपर्यंत पोलीस पोहचले होते. यापैकी अनेकांनी कारवाईच्‍या भितीने शहर सोडून पळ काढला होता. तर उर्वरित सराईत गुन्‍हेगारांवर पोलिसांनी मोका, एमपीडीए, तडीपार अशा प्रतिबंधात्‍मक कारवाई करून त्‍यांना जेल अथवा जिल्‍ह्याबाहेरचा रस्‍ता दाखविला होता.

यापूर्वीही केली अनेकांवर कारवाई –
हातात कोयता घेऊन सोशल मीडियावरून दहशत निर्माण करणार्‍या यमभाईची धिंड गुंडा विरोधी पथकाने काढली होती. तसेच हातात पिस्‍तुल घेऊन रिल्‍स तयार करणार्‍यांवरही गुन्‍हे शाखेने कारवाई केली होती. याशिवाय तलवारीने केक कापणार्‍यांवरही अनेकदा पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्‍या कारवाईचा धसका सराईत गुन्‍हेगार व त्‍यांच्‍या टोळ्यांनी घेतला असून आता या टोळ्या सोशल मीडियावर पोस्‍ट करताना दिसत नाहीत.


पोलीस ठाणे नुसार उभरत्‍या गुन्‍हेगारांची संख्‍या

झोन एक (एकूण ८०)

पिंपरी – २२
संत तुकाराम नगर – ००
भोसरी – १२
दापोडी – ००
सांगवी – ११
चिंचवड – १६
निगडी – १५
रावेत – ४
झोन दोन (एकूण १४४)

देहूरोड – २१
तळेगाव – ३७
शिरगाव – ६
तळेगाव एमआयडीसी – ७
वाकड – ११
काळेवाडी – २१
हिंजवडी – ४१
बावधन – ००
झोन तीन (एकूण ९७)

चाकण – २७
महाळुंगे – २०
आळंदी – ११
दिघी – ५
चिखली – १४
भोसरी एमआयडीसी – २०