- अहमदाबा
द कारवाईनंतर सायबर विश्वात खळबळ
दि . 31 ( पीसीबी ) – अहमदाबादमध्ये इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या सीसीटीव्ही सिस्टीम्स हॅक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. सायबर चोरट्यांनी रुग्णालयात उपचार घेत आलेल्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज एका अश्लील वेबसाईटवर अपलोड केले. यातून आर्थिक फायदा मिळवण्याचा सायबर गुन्हेगारांचा उद्देश होता. या घटनेनंतर महाराष्ट्र सायबर विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, सायबर तज्ज्ञांनी नेमकी कशी खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
नेटवर्क, सॉफ्टवेअर तपासणी महत्वाची
अहमदाबाद घटनेनंतर देशभरात सायबर सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. विशेषतः Wi-Fi नेटवर्क वर चालणाऱ्या CCTV प्रणालींच्या असुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. नागरिकांना आता केवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवून पूर्ण सुरक्षा मिळणार नाही, तर त्या कॅमेऱ्याशी जोडलेली सिस्टीम, नेटवर्क आणि सॉफ्टवेअर यांची देखील वेळोवेळी तपासणी करावी लागणार आहे.
नेटवर्कमधून मिळवला जातोय प्रवेश
अहमदाबाद प्रकरणात आरोपींनी रुग्णालयाच्या Wi-Fi नेटवर्कमधून प्रवेश मिळवून, CCTV प्रणाली हॅक केली. त्यानंतर DVR मध्ये साठवलेलं फुटेज चोरले आणि इंटरनेटवर प्रसारित केले. त्यामुळे यापुढे सीसीटीव्ही वापरकर्त्यांनी सीसीटीव्ही प्रणालीचे नेटवर्क आयडी आणि पासवर्ड सुरक्षित ठेवणे अधिक गरजेचे असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे.
अहमदाबाद घटनेवरून धडा
रुग्णालयात घडलेली घटना केवळ अहमदाबादपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण देशासाठी एक धोक्याची घंटा आहे. प्रत्येक घर, संस्था, दुकान, हॉस्पिटल किंवा शाळा जिथे जिथे सीसीटीव्ही आहे, तिथे तातडीने सायबर सुरक्षेचे उपाय अमलात आणणे गरजेचे आहे. अन्यथा, सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा धोकादायक ठरू शकते.
बाजारात मिळणारे स्वस्त CCTV धोकादायक!
अलीकडे बाजारात कमी किंमतीत सहज उपलब्ध असलेले अनेक CCTV कॅमेरे मूलभूत सायबर सुरक्षेविना येतात. अनेक ब्रँड्समध्ये डिफॉल्ट पासवर्डच बदलता येत नाही. ज्यामुळे हॅकर्सला सहज रिमोट अॅक्सेस मिळू शकतो. काही यंत्रणांमध्ये डेटा एन्क्रिप्शनच नसतो, त्यामुळे त्यातील फुटेज सहज चोरले जाऊ शकते. ग्राहक स्वस्त दर आणि इंस्टंट इंस्टॉलेशनच्या मोहात अशा धोकादायक पर्यायांना पसंती देत आहेत. मात्र, “ज्या कॅमेऱ्यांचे फर्मवेअर किंवा सॉफ्टवेअर अपडेट मिळत नाहीत, ज्यांचे डिफॉल्ट क्रेडेन्शियल्स बदलता येत नाहीत, किंवा जे ब्रँड ओळखीचे नाहीत, असे CCTV कधीच वापरू नयेत.” असा सल्ला सायबर तज्ञ देत आहेत.
सरकारी कार्यालयांनाही धोका?
अनेक सरकारी कार्यालये, न्यायालयीन परिसर, पोलीस ठाणे, महसूल खात्याची कार्यालये अशा ठिकाणी देखील CCTV प्रणाली कार्यरत आहेत. हे कॅमेरे अनेकदा महत्त्वाच्या फाईलिंग, चौकशी प्रक्रिया, नागरिकांच्या संवादाचे दृश्य कैद करत असतात. मात्र, या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या CCTV प्रणाली जर जुना फर्मवेअर वापरत असतील, इंटरनेटवर सरळ कनेक्टेड असतील आणि कोणतीही सायबर सुरक्षा नसेल, तर अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सरकारी कार्यालयांनी देखील सीसीटीव्ही सुरक्षा तपासणे गरजेचे आहे.
CCTV वापरताना खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी.
१. नेटवर्क सुरक्षा मजबूत करा:
- CCTV बसवल्यानंतर तात्काळ डिफॉल्ट पासवर्ड बदला.
- पासवर्ड शक्यतो मजबूत, युनिक आणि अल्फान्यूमेरिक असावा.
- 2FA (Two-Factor Authentication) सक्रिय करा.
- विश्वासार्ह डिव्हाइसेसना ऍक्सेस द्या आणि अनावश्यक डिव्हाइसेस तात्काळ डिस्कनेक्ट करा.
- VPN (Virtual Private Network) वापरून रिमोट अॅक्सेस सुरक्षित करा.
- CCTV लॉग्स नियमितपणे तपासा.
- DVR/NVR बंद खोलीत, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी ठेवा.
- क्लाऊड किंवा बाह्य हार्डड्राईव्हवर नियमित बॅकअप घ्या.
२. फर्मवेअर आणि सॉफ्टवेअर अपडेट ठेवा
- कंपनीकडून येणारे फर्मवेअर अपडेट्स वेळेवर इंस्टॉल करा.
- मोबाईल अॅप्स आणि डेस्कटॉप सॉफ्टवेअरची लेटेस्ट व्हर्जन्स वापरा.
३. सुरक्षित Wi-Fi नेटवर्कचा वापर करा
- WPA3 एन्क्रिप्शन असलेले Wi-Fi राऊटर वापरा.
- डिफॉल्ट राऊटर लॉगिन क्रेडेन्शियल्स (युजरनेम-पासवर्ड) तात्काळ बदला.
- CCTV सिस्टीमसाठी वेगळं Wi-Fi नेटवर्क असावं.
- नेटवर्कमध्ये फक्त आवश्यक डिव्हाइसेसच कनेक्ट ठेवा.
“सामान्य नागरिक सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवतात. मात्र, ती प्रणालीच असुरक्षित राहिली, तर सायबर गुन्हेगार त्याचा पैसे कमावण्यासाठी करू शकतात. त्यामुळे सायबर खबरदारी घेणं हे आता ऐच्छिक न राहता अत्यावश्यक बाब बनली आहे. नागरिकांनी वेळोवेळी सिस्टम अपडेट ठेवाव्यात, नेटवर्क्स मजबूत करावेत. दरम्यान, काही शंका येताच सायबर सेलशी संपर्क साधावा”, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक, सायबर ठाणे, पिंपरी – चिंचवड रविकिरण नाळे यांना केले आहे.