सावधान !!! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

0
215

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज्यभरात H3N2 या नवीन व्हायरसचे रुग्ण वाढत असतानाच आता कोव्हिड रुग्णसंख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत अचानक 50 टक्क्यांनी वाढल्याचं दिसतं. तर मुंबईतही गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णही वेगाने वाढत आहेत.

भारतातही दररोज नोंदवल्या जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत सहा पटींनी वाढ झाली आहे. यात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांत रुग्ण वाढल्याचं केंद्र सरकारने सांगितलं असून या राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,

“कोरोना केसेस वाढतायत हे बरोबर आहे. पण आता पुन्हा कमी होतील. अचानक केसेस वाढतात मग कमी होतात असं का होत आहे याचं कारण आता लगेच तरी सांगता येणार नाही. पण हवामान बदल झाल्यावर आणि तापमान वाढत असताना व्हायरल केसेसमध्ये वाढ होतेच. आता कोव्हिडच्या रुग्णसंख्येतही यामुळे वाढ होत आहे का, असं स्पष्ट सांगता येणार नाही.”

कोव्हिड विषाणूचा कोणतीही नवा व्हेरिएंट आढळला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 19 मार्च 2023 रोजी राज्यत 236 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर सध्या राज्यात कोव्हिडचे 1309 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आठ दिवसांपूर्वी म्हणजेच अगदी 13 मार्च 2023 रोजी पर्यंत दैनंदिन साधारण 50 ते 100 कोरोनाच्या नवीन रुग्णांचं निदान होत होतं. परंतु गेल्या काही दिवसांत राज्यात कोव्हिडचा प्रसार वेगाने झाल्याचं दिसतं. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2023 पर्यंत राज्यात 577 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते. आता हीच रुग्णसंख्या 1309 वर पोहोचली आहे. तर 12 मार्च रोजी राज्यात 101 नवीन रुग्णांची नोंद झाली होती तर 13 मार्च रोजी 61 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. परंतु आठवड्याभरात ही रुग्णसंख्या वाढली आणि 19 मार्च रोजी 24 तासात 236 नवीन रुग्ण आढळले.

दरम्यान, यात रुग्णालयात दाखल व्हावं राहणाऱ्याा रुग्णांची संख्या कमी असून मृत्यूदर 1.82% एवढा आहे. खरंतर नोव्हेंबर 2022 नंतर 13 मार्चला पहिल्यांदाच 24 तासांत 100 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर रुग्णसंख्या वाढत गेल्याचं दिसतं.