मुंबई, दि. १४ (पीसीबी) – नुपूर शर्मा प्रकरणात सध्या देशातल्या अनेक खासगी आणि सरकारी वेबसाईट्स हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यातच आता ठाणे पोलिसांची वेबसाईटही हॅक करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर हल्ल्याची आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पुष्टी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. वळसे पाटील म्हणाले की, गेल्या २ दिवसात देशात अनेक वेबसाईट हॅक झाल्यात. आपले सायबर प्रमुख याबाबद्दल तपासणी करत आहेत. ठाणे पोलिसांची वेबसाईट देखील हॅक झालीये. राज्य सरकारने याचा आढावा घेतलाय. यावर काय उपाययोजना करायच्या यावर यंत्रणा काम करत आहेत.
निलंबित भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. देशभरातल्या ७० हून अधिक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. मलेशियातल्या हॅक्टिविस्ट गृप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर हा हल्ला करण्यात आला होता. वेबसाईट हॅक करुन मुस्लीम धर्मियांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.