पिंपरी दि. 18 (पीसीबी) : सावकारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर पती जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना सोनावणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभांगी वैभव हांडे (वय 36) आणि धनराज वैभव हांडे (वय 9) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. तर पती वैभव मधुकर हांडे (वय 45, सर्व रा. सोनीगरा निलांगन हौसिंग सोसायटी, सोनावणे वस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष कदम, महिला आरोपी (दोघेही रा. ताथवडे), संतोष पवार (रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद खान (रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०१६ ते १८ जानवोरी २०२५ या कालावधीत घडली. या कालावधीमध्ये आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी वैभव हांडे यांच्या घरी येऊन व्याज न मिळाल्याने शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली.
दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याच्याकडून फिर्यादी यांनी सहा लाख रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने घेतले होते. महिला आरोपीकडून दोन लाख रुपये 10 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. आरोपी जावेद खान यांच्याकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात आरोपी संतोष त्याच्या मुद्दल रकमेची परतफेड करून नऊ लाख 50 हजार रुपये दिले होते. तसेच फिर्यादी यांच्या नावावर असलेली एक एकर जमीनही लिहून दिली होती. महिला आरोपीला दरमहा 20 हजार रुपये देऊन स्वतःच्या मालकीची 20 गुंठे जमीन लिहून दिली होती. तरी देखील महिला आरोपीने 14 लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला.
कुटुंबाला शिवीगाळ व मारहाण
आरोपी जावेद खान यांनी दिलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून चार लाख 50 हजार रुपये त्याला दिले. तर आरोपी संतोष पवार याच्याकडूनही साडेसात लाख रुपये घेतले होते व त्यापैकी बहुतांश रक्कम परत दिली होती. तरी देखील आरोपींनी व्याजाचे पैसे देण्यासाठी तगादा लावला. फिर्यादी वैभव हांडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.
कुटुंबाने घेतला गळफास
सावकारांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी सामुहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. तसेच तिघांनीही छताच्या पंख्याला गळफास घेतला. या घटनेत पत्नी शुभांगी व मुलगा धनराज यांचा मृत्यू झाला.
मुलाला पाठविली सुसाइड नोट
फिर्यादी यांच्या 14 वर्षीय मुलाला त्यांनी मुंबईतील नातेवाइकांकडे पाठविले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या मुलाच्या मोबाइलवर सुसाइड नोट पाठविली होती. रात्री मुलाने ही सुसाइड नोट पाहिली असता त्यांनी आपल्या पालकांना फोन केला. मात्र त्यांनी उचलला नाही. त्यामुळे त्याने शेजार्यांना फोन केला. त्यांनी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी रात्री पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी वैभव हे जिवंत असल्याचे दिसून येताच त्यांनी त्वरीत त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.