सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी

0
161
  • आपत्कालिन संपर्कासाठी १० दिवस विशेष संपर्क क्रमांक

पुणे, दि. ३ : यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना महावितरणकडून विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. सर्वधर्मीयांच्या उत्सवासाठी घरगुती दराने वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी अधिकृतपणे तात्पुरती वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तातडीच्या मदतीची गरज भासल्यास पुणे व पिंपरी चिंचवड शहर, आंबेगाव, जुन्नर, मावळ,खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांसाठी पुणे परिमंडलाने उत्सवातील दहा दिवसांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच नेहमीच्या १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी. विजेच्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या, रोहीत्र तसेच फिडर पिलर व इतर यंत्रणेला गणेशोत्सवातील आणि मिरवणुकातील देखाव्यांचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी.

गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.