सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0
59

दुबईतील बँक कर्मचाऱ्यासह आठ जणांना अटक

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी

चिंचवड, दि. 14 (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दुबईमधील बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांशी संबंध असलेल्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने काळेवाडी येथील एका वृद्ध व्यक्तीची ९९ लाखांची फसवणूक केली होती.

महादेव ऊर्फ मधुकर गंगाधर कटके (वय ४४, रा. कामोठे, नवी मुंबई), मसुद आलम सिद्दीकी (वय ४८, रा. लोढा बी विंग जोगेश्वरी पश्चिम मुंबई), मोहम्मद अफझल सलमानी (वय ४९, रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई), तौसिफ जैन्नुद्दिन सैय्यद (वय ४०, रा. इरानी कॉलनी, मालाड पुर्व, मुंबई), सागर ब्रम्हदेव भोसले (वय ३८, रा. लासुर्णे, ता. इंदापुर, जि. पुणे), इम्रान मोहम्मद हसन सय्यद (वय ४४, रा. कळवा, ठाणे), प्रणव प्रविण दळवी (वय ३०, रा. बोरीवली ईस्ट, मुंबई), दानिश दिलावर साठी (वय २४, रा. देवीपाडा रोड, मुंब्रा, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी काळेवाडी येथील जेष्ठ नागरीकास ऑनलाईन ट्रेडींग करण्यासंर्दभात अनोळखी इसमाने लिंक पाठवून व्हॉटसअप ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर CAUSEWAY नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवणुकीचे रोज दोन टास्क देऊन ते टास्क पूर्ण केल्यास ३०० टक्के पर्यंत नफा देण्याचे अमीष दाखवून विश्वास संपादन करत त्यांची ९९ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयामध्ये आर्थिक फसवणूक मोठ्या स्वरुपाची असल्याने सायबर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली. तपास करीत असताना आरोपींनी गुन्हयासाठी वापरलेल्या बँक अकाऊंटपैकी एक बैंक अकाऊंट हे मुंबई येथील असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सायबर पोलिसांनी मुंबई येथे जाऊन तपास केला. अकाऊंट धारकाने संबंधित बँक अंकाउट हे त्याचा मामा महादेव कटके याच्या सांगण्यावरुन काढून ते अंकाउट संपूर्ण किटसह त्याच्याकडे दिले असल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक तपास करुन तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत पोलिसांनी महादेव कटके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्या अकाऊंटसह इतर बँक अकाऊंट हे आरोपी मसुद आलम व सागर भोसले यास दिले असल्याचे सांगितले.

पोलिसांनी मुंबई मधून या प्रकरणात आठ जणांना अटक केली. प्राथमिक तपासामध्ये आरोपी दानिश दिलावर साठी हा दुबई येथील अबुधाबी बँकेमध्ये तीन वर्षपासून स्थायी कर्मचारी आहे. तो दुबई येथील त्याच्या साथीदाराच्या सांगण्यावरुन भारतात येऊन साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी प्रणव दळवी हा टेलिग्रामच्या माध्यमातून हाँगकाँग येथील इसमास बँक अकाऊंट विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

तपासामध्ये आरोपींकडून एकूण १३ मोबाईल, वेगवेगळे बँक अकाउंट, किट असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ७ लाख रुपये वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर होल्ड करण्यात आले आहेत. आरोपींचे दुबई, हाँगकाँग येथिल आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर संबध असल्याचे प्राथमिक तपासामध्ये दिसून आले आहे. आरोपींकडे एकूण ३६ बँक अकाऊंटची माहीती मिळाली आहे. त्यावर भारतात एकूण २७ पोर्टलच्या तक्रारी दाखल आहेत. तसेच काळेवाडी येथील गुन्हयासाठी वापरलेल्या बँक अकाऊंटवर २ कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार मिळून आले आहेत. सायबर पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, दिपक माने, अतुल लोखंडे, प्रितम भालेराव, श्रीकांत कबुले, अभिजीत उकिरडे, सौरभ घाटे, संदिप टेकाळे, निलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, दिपाली चव्हाण यांनी केली.