सायन्स पार्कमध्ये विज्ञान महोत्सव; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

0
372

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी- चिंचवड सायन्स पार्क व न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 26 ऑगस्ट 2022 दरम्यान भव्य अशा विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा होणार असल्याची माहिती संचालक प्रवीण तुपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

चिंचवड येथील सायन्सपार्क येथे हा विज्ञान महोत्सव होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या विद्यार्थ्यांसाठी सायन्स पार्क प्रदर्शनास मोफत प्रवेश असणार आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत ‘प्रदुषण विरहित वसंधुरा’ या विषयावर चित्रकला स्पर्धा होणार आहे. 4 थी ते 7 वी च्या मुलांचा लहान तर 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा मोठा गट असणार आहे. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत ‘निसर्ग जतन व संवर्धन’ या विषयावर निबंध स्पर्धा, 23 ऑगस्ट रोजी ‘नविकरणीय उर्जा’ विषयावर प्रश्नमंजुषा होईल. त्यात 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांचा माध्यमिक शाळा गट असणार आहे. या तीनही स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मनोरंजक रसायनशास्त्र या विषयावर सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा होणार आहे. 25 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता गंमतीशीर विज्ञान प्रयोग व्याख्यान व प्रात्यक्षिक होईल. त्याला सर्वांना प्रवेश असेल. तर, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक कार्यशाळा, दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत विज्ञान प्रकल्प पद्धती, विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, व्याख्यानाने प्रदर्शनाची सांगता होईल.