दि . १२ ( पीसीबी ) – बिकेसीमध्ये असलेला सायकल ट्रॅक उखडण्यासाठी 25 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास 10 किलोमीटर लांबीचे हे बिकेसीमध्ये सायकल ट्रॅक आता काढून टाकण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशाने रास्ता रुंदीकरण करता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
बिकेसीमध्ये दिवसेंदिवस कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून आता कोटी खर्चून तयार केलेल सायकल ट्रॅक काढून टाकण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च करण्याची नामुष्की पालिकेवर उद्भवली आहे. त्यासाठी कंत्राटदारांना नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
दरम्यान, अशाच प्रकारे रस्त्यातील वाहतुकिला प्रचंड अडथळा ठरणारे सायकल ट्रॅक पिंपरी चिंचवड शहरात आहेत. अर्बन स्ट्रीट फूटपाथच्या डिझाईनमध्ये असल्याने ते केले मात्र, प्रत्यक्षात एकाही सायकल ट्रॅकचा कोणीही वापर करत नाही. उलटपक्षी सर्व ठिकाणी रस्ता रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. बीकेसी प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही सर्व सायकल ट्रॅक उखडून रस्ता प्रशस्त करण्याची मागणी पुढे येते आहे.
शहरात बीआरटी मार्ग उखडून टाकण्याची मागणी सुरू झाली आहे. दापोडी ते निगडी या १२ किलोमीटरच्या मुंबई- पुणे महामार्गावर बीआरटी सर्वात मोठा अडथळा आहे. बीआरटी, अर्बन स्ट्रीट फूटपाथ, मेट्रो मुळे ६१ मीटर रुंदीचा हा महामार्ग निमुळता झाला आहे.